बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध कमालीचे बिघडले आहेत. या बिघडलेल्या परिणामांचा प्रभाव आता क्रिकेटवरही पडला आहे. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आज आयसीसीकडे धाव घेत सुरक्षेच्या कारणास्तव आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतामध्ये खेळण्यास असमर्थता दर्शवत आपल्या सामन्यांचं ठिकाण बदलण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आता आयसीसीकडून बांगलादेश क्रिकेट बोर्डाची ही मागणी मान्य झाल्यास तो बीसीसीआयसाठी मोठा धक्का ठरणार आहे.
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ मुस्तफिजूर रहमान या बांगलादेशी क्रिकेटपटूला आयपीएलमध्ये खेळवण्यास विरोध झाल्यानंतर त्याला आयपीएलमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट संघटनेने आयसीसीला पत्र लिहून भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आपले सामने सहआयोजक असलेल्या श्रीलंकेमध्ये खेळवले जावेत, अशी विनंती केली आहे.
बांगलादेश क्रिकेटच्या या विनंतीवर आयसीसीने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मात्र या विनंतीवर बांगलादेश क्रिकेट संघटनेकडून गांभीर्याने विचार केला जात आहे. तसेच त्यामध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रामुख्याने विचार केला जात आहे. दरम्यान, आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाची ही विनंती मान्य केली तर पाकिस्तानपाठोपाठ बांगलादेशचेही सर्व सामने श्रीलंकेत होतील. तसेच त्याचा मोठा फटका बीसीसीआयला बसू शकतो.