टी २० विश्वचषक स्पर्धेतील सुपर ८ फेरीत आज श्रीलंका आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत. स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलेल्या श्रीलंकेसाठी ही लढत तितकीशी महत्त्वाची नाही आहे. मात्र काल न्यूझीलंडच्या झालेल्या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्याची अंधुकशी संधी निर्माण झालेल्या पाकिस्तानसाठी ही लढत महत्त्वाची ठरणार आहे. मात्र स्पर्धेतील वाटचालीच्या दृष्टीने श्रीलंकेच्या संघासाठी केवळ औपचारिकता उरलेली ही लढत एका वेगळ्याच कारणामुळे महत्त्वाची ठरणार आहे.
पल्लेकेले येथे होणाऱ्या या लढतीचा निकाल पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या संघांचं स्पर्धेतील भवितव्य निर्धारित करणार आहे. या लढतीत श्रीलंकेचा संघ जिंकला तर न्यूझीलंड उपांत्य फेरीत प्रवेश करेल. मात्र पाकिस्तानच्या संघाने आवश्यक धावगतीसह बाजी मारली तर पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
मात्र या लढतीमध्ये एक आर्थिक गणितही दडलेलं आहे. जर श्रीलंकेच्या संघाने आज विजय मिळवला, तर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाद होईल आणि पाकिस्तानच्या अनुपस्थितीत उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने भारतात खेळवले जातील. मात्र पाकिस्तानचा संघ उपांत्य आणि अंतिम सामन्यात खेळणार असेल, तर एक उपांत्य सामना आणि अंतिम सामना हा श्रीलंकेत खेळला जाईल. अशा स्थितीत पहिला उपांत्य सामना ४ मार्च रोजी आणि अंतिम सामना ८ मार्च रोजी खेळवला जाईल.
तसेच पाकिस्तान आणि भारताचे संघ उपांत्य फेरीत पोहोचले तर स्पर्धेतील रंगत आणखीनच वाढणार आहे. तसेच अशा परिस्थितीत अंतिम सामनासुद्धा श्रीलंकेत खेळला जाईल. तसेच या सामन्यामुळे गेट मनी, हॉटेलचं बुकिंग, पर्यटन आणि इतर माध्यमातून श्रीलंकेला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळणार आहे. तसेच त्या माध्यमातून श्रीलंकेच्या आर्थिक स्थितीलाही बळकटी मिळू शकते.
अशा परिस्थितीत स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलं असताना पाकिस्तानवर विजय मिळवून उपांत्य आणि अंतिम फेरीच्या यजमान पदावर पाणी सोडायचं की पाकिस्तानविरुद्ध थोडा औपचारिक खेळ करून पाकिस्तानला पुढे चाल द्यावी, असा प्रश्न श्रीलंकेसमोर असेल. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खेळभावना पाहता श्रीलंकेचा संघ असं काही करण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण जाणीवपूर्वक असं काही केल्यास श्रीलंकेच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो.