ICC T20 World Cup 2024 IND vs IRE Live Scorecard - भारतीय संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) चार ऑल राऊंडर्सना खेळवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत. काल झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने तशी कल्पना दिली आहे. पण, न्यू यॉर्कची खेळपट्टी पाहता इथे फिरकीपटूंचा मारा प्रभावी ठरू शकतो.. अशात अतिरिक्त फलंदाजासाठी ४ ऑल राऊंडरला खेळवण्याचा निर्णय टीम इंडियाच्या अंगलट येऊ शकतो.
न्यू यॉर्कमध्ये भारताचे लीग सामने होणार आहेत आणि पहिला सामना आज आयर्लंडविरुद्ध आहे. यानंतर टीम इंडियाला ९ जून ( वि. पाकिस्तान ) आणि १२ जून ( वि. अमेरिका ) यांच्याशिवाय कॅनडाविरुद्धचा अंतिम लीग सामना १५ जून रोजी फ्लोरिडामध्ये खेळायचा आहे. आयर्लंडविरुद्धच्या लढतीपूर्वी रोहित म्हणाला,''आमचे लक्ष फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यावर आहे, विरोधी संघ काय करत आहे यावर नाही. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीत खेळता, तेव्हा एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे होते. खेळपट्टीचा विचार केला तर चार खेळपट्टी आहेत. आम्ही कोणत्या खेळपट्टीवर खेळू हे आम्हाला माहीत नाही. अशा खेळपट्टीमध्ये फलंदाजीबरोबरच गोलंदाजीही महत्त्वाची असते.''
''अमेरिकेत आम्हाला क्रिकेट खेळायला मिळेल असे कधीच वाटले नव्हते. येथे स्पिनरची भूमिका महत्त्वाची असेल. आमचे दोन फिरकीपटू जडेजा आणि अक्षर हे अष्टपैलू आहेत. संघाचा समतोल साधायचा असेल तर अष्टपैलू खेळाडू हवेत. वेगवान गोलंदाजांमध्ये आमच्याकडे हार्दिक आणि शिवम आहेत. त्यांचा वापर कसा करायचा याचा विचार केला. या चौघांची भूमिका मोठी असेल. हे चौघे एकत्र खेळू शकतील की नाही ते बघू,'' असे रोहित म्हणाला.
भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह; राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद