दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेच्या कार्यक्रमाची मंगळवारी घोषणा केली. त्यात भारताची सलामी लढत दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे.
भारताला पहिला सामना पर्थमध्ये २४ ऑक्टोबरला खेळायचा आहे, तर स्पर्धेला १८ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. त्यावेळी पात्रता फेरीचे सामने होतील. गेल्या स्पर्धेत २०१६ मध्ये उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध पराभूत झालेला भारतीय संघ २९ ऑक्टोबरला पुढच्या सुपर १२ सामन्यात क्वालिफायरसोबत खेळेल.
पुरुष टी-२० विश्वकप स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे. त्याआधी, पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाची लढत २४ ऑक्टोबरला सिडनीमध्ये जगातील अव्वल संघ पाकिस्तानसोबत होईल. आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्डसन म्हणाले, जगातील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम मैदान, जल्लोष करणारे, क्रिकेटची जाण असलेल्या प्रेक्षकांची टी-२० विश्वकप स्पर्धेत गरज असते. हे सर्व ऑस्ट्रेलियात मिळते.’
गतचॅम्पियन वेस्ट इंडिजचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध २५ ऑक्टोबरला मेलबोर्नमध्ये खेळला जाणार आहे. ग्रुप वनमध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि दोन क्वालिफायर तर दुसºया ग्रुपमध्ये भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि दोन क्वालिफायर राहतील.
महिलांपुढे सलामीला ऑस्ट्रेलियाचे आव्हान
भारतीय महिला क्रिकेट संघ २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असलेल्या टी-२० विश्वकप स्पर्धेत पहिल्या समान्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
भारतीय संघ २४ फेब्रुवारी रोजी पर्थमध्ये क्वालिफायरसोबत खेळेल. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी मेलबोर्नमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळायचे आहे. याच मैदानावर भारतीय संघ अखेरचा राऊंड रॉबिन सामना श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. उपांत्य सामने ५ मार्च रोजी, तर अंतिम लढत ८ मार्च रोजी अनुक्रमे सिडनी व मेलबोर्नमध्ये होतील.