हैदराबाद - 21 ऑक्टोबरपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी विंडीजच्या संघाला धक्का बसला आहे. हैदराबाद कसोटीदरम्यान टीव्ही पंचांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी विंडीजचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांना आयसीसीने दोन एकदिवसीय सामन्यांमधून निलंबित केले आहे. तसेच लॉ यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. या कारवाईमुळे लॉ यांना 21 आणि 24 ऑक्टोबरला भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये विंडीजच्या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळता येणार नाही.
आयसीसीने मंगळवारी एक पत्रक प्रसिद्ध करून या संदर्भातील माहिती दिली आहे. भारत आणि विंडीजच्या संघामध्ये हैदराबाद येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान स्टुअर्ट लॉ यांनी टीव्ही पंचांशी गैरवर्तन केले होते. दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कायरन पॉवेल याला बाद ठरवण्यात आल्यानंतर लॉ हे टीव्ही पंचांच्या केबिनमध्ये गेले. तिथे त्यांनी पंचांच्या निर्णयाविरोधात आक्षेपार्ह विधाने केली होती. या गुन्ह्यासाठी आयसीसीच्या आचारसंहितेमधील कलम 2.7 मधील लेव्हल अन्वये स्टुअर्ट लॉ यांना दोषी ठरवण्यात आले.
याआधी 2017 साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या डोमिनिका कसोटीदरम्यान लॉ यांच्यावर 25 टक्के दंडाची कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी लॉ यांनी पंच ब्रुस ऑक्सनफोर्ड, इयान गोल्ड. तिसरे पंच निजेल लाँग आणि चौथे पंच नितीन मेनन यांच्यावर आरोपांची राळ उडवली होती.