आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे ICC चे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. आयसीसी बोर्डाची आज बैठक झाली आणि श्रीलंका क्रिकेट एक सदस्य म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले. विशेषत: श्रीलंकेत क्रिकेट त्यांचे व्यवहार स्वायत्तपणे व्यवस्थापित करत नव्हते आणि त्यांच्या प्रशासनात त्यांचे सरकार हस्तक्षेप करत असल्याचे आयसीसीच्या निदर्शनास आले. निलंबनाच्या अटींबाबत आयसीसी बोर्ड योग्य वेळी निर्णय घेईल. या निर्णयामुळे त्यांना आता आयसीसीच्या कोणत्याच स्पर्धेत खेळता येणार नाही.
भारतात सुरू असलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यांना ९पैकी केवळ २ सामने जिंकता आले आणि ते गुणतालिकेत ९व्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे २०२५ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही ते पात्र ठरू शकले नाही. भारताकडून झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्यात आले आहे. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने ही कारवाई केली होती. यासोबतच क्रीडा मंत्रालयाने श्रीलंकेतील क्रिकेट सुरळीत पार पाडण्यासाठी अंतरिम क्रिकेट समिती देखील स्थापन केली आहे. या समितीची जबाबदारी श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याच्याकडे सोपवण्यात आली आहे.