Bangladesh vs ICC T20 World Cup 2026: भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजकीय संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावाचे झाले आहेत. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारामुळे भारत सरकार आणि BCCI ने कठोर पावले उचलली. बांगलादेशी खेळाडूंना IPL मध्ये खेळण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर बांगलादेशने IPL प्रसारणावर बंदी घातली आणि सुरक्षेचे कारण देत टी२० विश्वचषकासाठी भारतात येण्यास नकार दिला. परिणामी, ICC ने बांगलादेशच्या संघाची विश्वचषक स्पर्धेतून हकालपट्टी केली. त्यातच आता टी२० विश्वचषक २०२६ साठी आयसीसीने बांगलादेशी क्रीडा पत्रकारांना अधिकृत मान्यता (Accreditation) देण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे बांगलादेशी पत्रकारांना स्पर्धेचे थेट कव्हरेज करता येणार नाही.
मान्यता नाकारण्याचे कारण काय?
बांगलादेशची टीम आधीच या विश्वचषकातून बाहेर पडली. आता पत्रकारांनाही स्पर्धेपासून दूर ठेवण्यात आले आहे. केवळ भारतात होणारे सामनेच नाही, तर श्रीलंकेत होणाऱ्या सामन्यांचे कव्हरेज करण्यासाठीही बांगलादेशी पत्रकारांना परवानगी नाकारण्यात आली आहे. आयसीसीने हे एक्रीडेटेशन का नाकारले, याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि आयसीसी यांच्यातील वाढत्या तणावाचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
आता पुढे काय होणार?
या निर्णयामुळे बांगलादेशातील क्रिकेट चाहत्यांना आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मिळणारी मैदानातील अपडेट्स आणि सविस्तर वार्तांकने आता मिळणार नाहीत. टी-२० विश्वचषक २०२६चे यजमानपद संयुक्तपणे भारत आणि श्रीलंकेकडे आहे. बांगलादेशी पत्रकारांना मान्यता नाकारल्यामुळे क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. हळूहळू बांगलादेश क्रिकेट आणि ICC यांच्यातील तीव्र होत चाललेल्या वादात पुढे काय घडणार, याकडे क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे.