दुबई/ढाका: २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बांगलादेश क्रिकेट बोर्डाची एक महत्त्वाची मागणी फेटाळून लावली आहे. बांगलादेशने भारतातील आपले सामने श्रीलंका किंवा इतर तटस्थ ठिकाणी हलवण्याची विनंती केली होती, मात्र आयसीसीने ती फेटाळत बांगलादेशला कडक इशारा दिला आहे. इतकेच नाही तर, जर बांगलादेश संघ भारतामध्ये सामने खेळण्यासाठी आला नाही, तर त्यांचे 'पॉइंट्स' (गुण) कापले जातील, असा कडक इशाराही देण्यात आला आहे.
२०२६ चा टी-२० विश्वचषक भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. बांगलादेशमधील सध्याची राजकीय परिस्थिती आणि भारतातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपले सामने श्रीलंकेत शिफ्ट करण्याची विनंती आयसीसीकडे केली होती. बांगलादेशला आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेची चिंता असल्याने त्यांनी हा प्रस्ताव दिला होता.
आयसीसीची भूमिका आणि इशारा
आयसीसीने बांगलादेशची ही मागणी केवळ फेटाळलीच नाही, तर यजमान देशाच्या नियमांचे आणि वेळापत्रकाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. आयसीसीच्या मते, स्पर्धांचे वेळापत्रक आणि ठिकाणे आधीच निश्चित झाली असून शेवटच्या क्षणी असे बदल करणे शक्य नाही. तसेच, जर बांगलादेशने खेळण्यास नकार दिला किंवा सुरक्षेचे अवास्तव कारण पुढे केले, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही आयसीसीने दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारतात होणार सामने?
वेळापत्रकानुसार, बांगलादेशचे काही सामने भारतात होणे नियोजित आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे सामने बदलले जाणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डासमोर पेच निर्माण झाला असून, आता त्यांना ठरलेल्या ठिकाणीच सामने खेळावे लागतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीने स्पष्ट केले आहे की, स्पर्धा नियोजित वेळेनुसार आणि ठरलेल्या ठिकाणीच पार पडेल. बांगलादेशला विश्वचषक खेळण्यासाठी भारतात यावेच लागेल. जर त्यांनी सुरक्षेचे कारण पुढे करून भारताचा दौरा टाळला, तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या गुणांवर होईल आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो.
दुसरीकडे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले की, आयसीसीकडून विनंती फेटाळल्याबाबत त्यांना अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.