ICC Rankings Deepti Sharma Becomes No 1 T20I Bowler Smriti Mandhana Slips : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) मंगळवारी, २३ डिसेंबरला जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय संघाची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने इतिहास रचला आहे. आपल्या टी-२० कारकिर्दीत पहिल्यांदाच ती ICC क्रमवारीत अव्वल गोलंदाज ठरली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दीप्तीनं इतिहास रचला; स्मृती मानधनाला फटका
एका बाजुला दीप्ती शर्मानं इतिहास रचला आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिला मात्र फटका बसला आहे. तिने वनडे क्रमवारीतील नंबर वनचा मुकूट गमावला आहे. महिला वनडेत बॅटर्सच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हिने आयर्लंडविरुद्धच्या दमदार कामगिरीच्या जोरावर स्मृती मंधानाला मागे टाकत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपासून लॉरा आणि स्मृती यांच्यात नंबर वनची लढाई पाहायला मिळत आहे. भारतीय महिला संघ वनडेत सक्रीय होताच स्मृती पुन्हा नंबर वनवर कब्जा करेल, अशी अपेक्षा आहे.
Flashback 2025: टेस्टमध्ये गिल; वनडेत स्मृती! T20I त मात्र लिंबू टिंबू संघातील पठ्ठ्यानं गाजवलं वर्ष
ऑस्ट्रेलियन अॅनाबेल सदरलँड मागे टाकत ठरली जगात भारी
श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मैदानातील टी-२० मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात २८ वर्षीय दीप्ती शर्माने एक विकेट घेतली होती. या कामगिरीसह तिने ५ रेटिंगची कमाई करत ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँड हिला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. दीप्ती शर्माच्या खात्यात ७३७ रेटिंग पॉइंट्स आहेत. अॅनाबेल सदरलँड ७३६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाकडून क्रिकेटच्या मैदानात खास छाप सोडणाऱ्या दीप्ती शर्माची UP पोलिस प्रशासनात DSP पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. DSP सिराजप्रमाणे लेडी DSP चाही क्रिकेट जगतात जलवा पाहायला मिळत आहे.
अरुंधती रेड्डीसह जेमिमा रोड्रिग्जच्या क्रमवारीत सुधारणा
भारताची वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी हिनेही श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रमवारीत पाच स्थानांची झेप घेत ३६ व्या स्थानावर पोहोचली आहे. भारतीय संघाची स्टार फलंदाज जेमिमा रोड्रिग्ज हिने पाच स्थानांच्या सुधारणेसह ICC च्या टी-२० रँकिंगमध्ये नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. जेमिमा रोड्रिग्जने श्रीलंकेविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावत सामनावीर पुरस्कार पटकावला होता. या कामगिरीमुळे तिला मोठा फायदा झाल्याचे दिसते. टी-२० क्रमवारीतील बॅटर्सच्या यादीत स्मृती मानधना तिसऱ्या तर शफाली वर्मा दहाव्या स्थानावर आहे.