Join us

पाकिस्तानच्या विजयाने दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत, २ जागांसाठी चौघांमध्ये खरी चुरस उरली

ICC ODI World Cup Semi Final Scenario : पाकिस्तान संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत शनिवारी न्यूझीलंडवर विजय मिळवून उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 20:01 IST

Open in App

ICC ODI World Cup Semi Final Scenario : पाकिस्तान संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत शनिवारी न्यूझीलंडवर विजय मिळवून उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. न्यूझीलंडच्या ६ बाद ४०१ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने २५.३ षटकांत १ बाद २०० धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द करावा लागला आणि DLS डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तान २१ धावांनी जिंकला. पाकिस्तानच्या या विजयाने दक्षिण आफ्रिकेचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के झाले आणि उऱलेल्या २ जागांसाठी ४ स्पर्धक उरले. 

न्यूझीलंडचा हा सलग चौथा पराभव ठरला आणि त्यांना शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा ( ९ नोव्हेंबर) सामना करायचा आहे. न्यूझीलंड ८ गुण व ०.३९८ नेट रन रेटसह चौथ्या स्थानावर कायम आहेत. पाकिस्तानचा संघ ८ गुण व ०.०३६ नेट रन रेटसह पाचव्या क्रमांकावर आला आहे आणि त्यांना ११ नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तानने आपापले सामने जिंकले तर त्यांचे प्रत्येकी १० गुण होतील आणि नेट रन रेट निर्णायक ठरेल. अशा परिस्थितीत न्यूझीलंडची बाजू भक्कम आहे.

ऑस्ट्रेलिया आता इंग्लंडविरुद्ध खेळतेय आणि त्यांचे २ सामने शिल्लक राहतील. त्यांना अफगाणिस्तान ( ७ नोव्हेंबर) व बांगलादेश ( ११ नोव्हेंबर) यांचा सामना करायचा आहे. अशात त्यांनी तिन्ही सामने जिंकल्यास त्यांचे १४ गुण होतील व ते दक्षिण आफ्रिकेशी बरोबरी करतील, नेट रन रेटवर गुणतालिकेतील स्थान ठरेल. अफगाणिस्तानचे ८ गुण आहेत आणि २ विजय मिळवून ते १२ गुण करू शकतील. त्यांना ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे. 

सध्या १२ गुणांसह आफ्रिका उपांत्य फेरीत निश्चित पोहोचला आहे, त्यांना उर्वरित दोन सामन्यांत भारत व अफगाणिस्तानचा सामना करायचा आहे. यापैकी एक विजय त्यांच्या अंतिम ४ मधील स्थानावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुरेसा ठरेल. पाकिस्तानला उपांत्य फेरीच्या गणितासाठी इंग्लंडवर विजय मिळवावा लागेल, शिवाय न्यूझीलंडचा श्रीलंकेविरुद्धचा पराभव आणि अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव अपेक्षित आहे. 

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपद. आफ्रिकापाकिस्तानन्यूझीलंडआॅस्ट्रेलिया