ICC ODI World Cup PAK vs AUS Live : पाकिस्तानच्या संघाने पुन्हा एकदा शरणागती पत्करली. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा एकदा विक्रमी धावसंख्येचा पाठलाग पाकिस्तान करतोय की काय, अशी परिस्थिती होती. पण, ॲडम झम्पाने ( ४-५३) मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या अन् ऑस्ट्रेलियाने हातातून निसटलेला सामना खेचून आणला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आणि गुणतालिकेत ४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली.
इमाम-उल-हक ( ७०) आणि अब्दुल्लाह शफिक ( ६४) यांनी मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेतला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३४ धावा जोडल्या. मार्कस स्टॉयनिसने या दोघांना माघारी पाठवले. शफिक व इमाम यांची १३४ धावांची भागीदारी ही पाकिस्तानी ओपनर्सकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी सर्वोत्तम ठरली. मोहसिन खान व मुदस्सर नजर यांनी १९८५ मध्ये १४१ धावा जोडल्या होत्या. ॲडम झम्पाने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. झम्पाच्या चेंडूवर बाबरने पुल शॉट मारला परंतु मिड विकेटला पॅट कमिन्सने अफलातून झेल घेतला. बाबर १४ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने १८ धावांवर माघारी परतला. वर्ल्ड कप स्पर्धेत चार सामन्यांत त्याला ५ ( वि. नेदरलँड्स), १० ( वि श्रीलंका), ५० ( वि. भारत) अशी कामगिरी करता आलेली आहे.
सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी ऑस्ट्रेलियाचे टेंशन कायम ठेवताना ४८ चेंडूंत ५७ धावा जोडल्या होत्या. पॅट कमिन्स गोलंदाजीला आला आणि त्याने शकीलला ३० ( ३१ चेंडू) धावांवर माघारी पाठवून पाकिस्तानला चौथा धक्का दिला. पाकिस्तानला ९० चेंडूंत १३६ धावा करायच्या होत्या आणि रिझवान व इफ्तिखार अहमद ही स्फोटक खेळ करणारी जोडी उभी होती. इफ्तिखारने कमिन्सच्या पुढच्या षटकात दोन खणखणीत षटकार खेचले. पण, त्याला ( २६) झम्पाने पायचीत पकडले आणि रिझवानसोबतची त्याची ३७ धावांची भागीदारी तुटली. झम्पाने पुढच्या षटकात रिझवानला ( ४६) धावांवर पायचीत करून ऑस्ट्रेलियाला मोठं यश मिळवून दिले.

पदार्पणवीर उसामा मीर भोपळ्यावर जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर परतला. झम्पाने त्याच्या शेवटच्या षटकात मोहम्मद नवाझला ( १४) बाद केले. झम्पाने १० षटकांत ५३ धावांवर ४ विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्सने ४५व्या षटकात हसन अलीची ( ८) विकेट घेतली. कमिन्सने शेवटची विकेट घेतली आणि पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४५.३ षटकांत ३०५ धावांवर तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाने ६२ धावांनी सामना जिंकला.
तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नर ( १६३) आणि मिचेल मार्श ( १२१) यांच्या विक्रमी फटकेबाजीने पाकिस्तानला हतबल केले होते. पण, पाकिस्तानी गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. शाहीन आफ्रिदीने १०-१-५४-५ अशी अप्रतिम स्पेल टाकली. वॉर्नर व मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी २५९ धावांची भागीदारी केली. मार्श १०८ चेंडूंत १० चौकार व ९ षटकारांसह १२१ धावांवर झेलबाद झाला. वॉर्नर १२४ चेंडूंत १४ चौकार व ९ षटकारांसह १६३ धावांवर बाद झाला. ३२५ धावांवर ऑस्ट्रेलियाची ही चौथी विकेट पडली अन् त्यानंतर त्यांना पुढील ८ षटकांत ४२ धावा करता आल्या. पाकिस्तानने ६ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाला ९ बाद ३६७ धावाच करता आल्या.