Join us

सचिन माझा हिरो आहे, त्याच्या विक्रमाशी बरोबरी माझ्यासाठी.... ! विराट कोहली म्हणतो..

ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi :  भारतीय संघाचे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग आठव्या विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 21:03 IST

Open in App

ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi :  भारतीय संघाचे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग आठव्या विजयाची नोंद केली. २००३च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने असा पराक्रम केला होता. विराट कोहलीने विक्रमी ४९वे शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या वन डेतील सर्वाधिक शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतर रविंद्र जडेजाने ५ विकेट्स घेतल्या. भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३२७ धावांच्या उत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २७.१ षटकात ८३ धावांवर तंबूत परतला. 

‘बार बार दिन ये आये…’, वाढदिवशी ‘विराट’ शतक, सचिनच्या विश्वविक्रमाच्या बरोबरीसह अनेक पराक्रम

रोहित शर्माने ( ४० धावा, २४ चेंडू)  दमदार सुरुवात करून दिली. विराट कोहली व श्रेयस अय्यर यांच्या १३४ धावांच्या भागीदारीने संघाला मजबूत स्थितीत आणले.  श्रेयस अय्यर ( ७७), सूर्यकुमार यादव ( २२) व रवींद्र जडेजा ( २९*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ५ बाद ३२६ धावांचा डोंगर उभा केला.  विराटने १२१ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद १०१ धावा केल्या. आफ्रिकेचा संपूर्ण संघ २७.१ षटकांत ८३ धावांवर माघारी पाठवला आणि २४३ धावांनी सामना जिंकला. जडेजाने ९-१-३३-५ अशी स्पेल टाकली. कुलदीप यादव व शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. युवराज सिंगनंतर वर्ल्ड कपमध्ये सामन्यात ५ विकेट्स घेणारा जड्डू दुसरा भारतीय फिरकीपटू ठरला. 

नायकाचा विक्रम तोडणे माझ्यासाठी....प्लेअर ऑफ दी मॅच ठरलेला विराट म्हणाला, हा एक मोठा सामना होता. कदाचित आतापर्यंतच्या स्पर्धेतील सर्वात कठीण संघाविरुद्ध खेळताना चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. माझ्या वाढदिवशी ज्या लोकांनी हा क्षण खास बनवला त्यांचे आभार. सलामीवीर त्या पद्धतीने सुरुवात करून देतात त्याने तुमचे पुढचे काम सोपे होते. जुन्या चेंडूमुळे परिस्थिती बदलली होती. व्यवस्थापनाने मला शेवटपर्यंत फलंदाजी करण्यास सांगितले होते आणि त्यांच्या दृष्टीकोनामुळे मी आनंदी होतो.  

मला क्रिकेट खेळायला आवडते आणि ते आता अधिक महत्वाचे आहे, मी पुन्हा संघासाठी योगदान देऊ शकलो याचा आनंद आहे. तेंडुलकरचे ट्विट खूप खास आहे. माझ्या हिरोच्या विक्रमाशी बरोबरी केली आणि  हा खूप मोठा सन्मान आहे. तो एक भावनिक क्षण आहे. मला माहित आहे की मी कुठून आलो आहे, मी सचिनला टीव्हीवर पाहिलेले दिवस माहित आहेत. त्याच्याकडून कौतुक मिळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, असेही विराट म्हणाला. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपविराट कोहलीसचिन तेंडुलकरभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका