ICC ODI World Cup India vs South Africa Live Marathi : विराट कोहलीच्या विक्रमी शतकानंतर भारतीय गोलंजादांनी पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत प्रतिस्पर्धी गोलंदाजांना चोप देणारे दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर अपयशी ठरले. रवींद्र जडेजाच्या दोन विकेट्सने आफ्रिकेची अवस्था ५ बाद ४० अशी झाली. सर जडेजाने टाकलेल्या अविश्वसनीय चेंडूवर कर्णधार टेम्बा बवुमाचा उडालेला त्रिफळा सर्वांना चकित करणारा ठरला.
'बर्थ डे'ला शतक झळकावल्याचा आनंद...! सचिनच्या 'विराट' विक्रमाशी बरोबरीनंतर कोहली म्हणतो...
रोहित शर्माने ( ४० धावा, २४ चेंडू) ज्या प्रकारे सुरुवात केली होती, ती पाहता भारत आज ३५०-४०० धावा बनवेल असे वाटले. पण, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत चांगला मारा केला आणि भारताच्या धावांचा वेग संथ केला. विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी सुरुवातीला सावध खेळ केला आणि सेट झाल्यानंतर आफ्रिकेच्या गोलंदाजांना चोप दिला. श्रेयस अय्यर ( ७७), सूर्यकुमार यादव ( २२) व रवींद्र जडेजा ( २९*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ५ बाद ३२६ धावांचा डोंगर उभा केला. विराटने १२१ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद १०१ धावा केल्या.
भारतीय गोलंदाजांसमोर कोणत्याही फलंदाजाचा निभाव लागणे तसे अवघडच आहे. पण, आफ्रिकेच्या फलंदाजांनी यंदा कहर बरसवला आहे. त्यामुळे आज चुरशीची स्पर्धा अपेक्षित होती. मात्र, मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात क्विंटन डी कॉकला ( ५) त्रिफळाचीत केले. रवींद्र जडेजाने ९व्या षटकात टेम्बा बवुमाचा ( ११) त्रिफळा उडवला आणि मोहम्मद शमीने भारताच्या मार्गातील आणखी एक अडथळा दूर केला. एडन मार्कराम ( ९) आज अपयशी ठरला. त्यानंतर जडेजाने आणखी एक धक्का देताना हेनरिच क्लासेनला ( १) पायचीत पकडले. त्यानंतर मोहम्मद शमीने रॅसी व्हॅन डेर ड्युसेनला ( १३) पायचीत केल्याने आफ्रिकेचा निम्मा संघ ४० धावांवर माघारी परतला.