ICC ODI World Cup India vs Pakistan Live : भारतीय संघाने आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचे वस्त्रहरण केले. गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) दमदार फटकेबाजी केली. त्याचे शतक थोडक्यात हुकल्याची खंत चाहत्यांच्या मनाला लागून राहिली. भारताने विजयाची हॅटट्रिक साजरी करताना गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. भारतीय संघाने ७ विकेट्स व ११७ चेंडू राखून पाकिस्तानला पराभूतही केलं अन् गुणतालिकेत मोठा धक्काही दिला.
जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा व सिराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९१ धावांत तंबूत पाठवला. अब्दुल्लाह शफीक ( २०) आणि इमाम-उल-हक ( ३६) हे माघारी परतल्यानंतर बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी ८३ धावांची भागीदारी करुन पाकिस्तानला सावरले. पण, सिराजने अर्धशतकवीर बाबरचा ( ५०) त्रिफळा उडवला. सौद शकील ( ६) आणि इफ्तिखार अहमद ( ४) हे कुलदीपचे बळी ठरले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने रिझवानचा ( ४९) त्रिफळा उडवला आणि पाठोपाठ शादाब खानचीही ( २) दांडी गुल केली. २ बाद १५५ वरून पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९१ धावांत तंबूत परतला.
गुणतालिकेत फेरबदल...भारताने या विजयासह १.८२१ अशा नेट रन रेटसह अव्वल स्थानी झेप घेतली. या लढतीपूर्वी भारताचा नेट रन रेट हा १.५०० असा होता. तेच पाकिस्तानचा नेट रन रेट ०.९२७ इतका होता. मात्र आता त्यांचा नेट रन रेट वजामध्ये गेला आहे आणि ते -०.१३७ अशा नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. न्यूझीलंड ६ गुण व १.६०४ नेट रन रेटसह दुसऱ्या, तर दक्षिण आफ्रिका २.३६० नेट रन रेट व ४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.