ICC ODI World Cup IND vs ENG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाने घोडदौड कायम राखताना विजयी षटकार खेचला. २२९ धावांचा बचाव भारतीय संघ करेल की नाही अशी शंका मनात आली होती, पण मोहम्मद शमीने ( ४-२२) पुन्हा एकदा कमाल केली. जसप्रीत बुमराह ( ३-३२), कुलदीप यादव ( २-२४) आणि रवींद्र जडेजाची ( १-१६) त्याला साथ मिळाली. गतविजेत्या इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. पण, गतविजेत्यांचे आव्हान आता अधिकृतपणे संपुष्टात आले आहे.
७.२ अंश कोनात फिरला चेंडू, कुलदीप यादवने टाकला बॉल ऑफ टुर्नामेंट; इंग्लिश कॅप्टन बोल्ड, Video
जॉनी बेअरस्टो व डेवीड मलान यांनी ३० धावांची सलामी दिली होती, परंतु जसप्रीत बुमराहने सलग दोन चेंडूंत मलान ( १६) आणि जो रूट ( ०) यांना माघारी पाठवले. त्यानंतर मोहम्मद शमीने बेन स्टोक्स ( ०) आणि बेअरस्टो ( १४) यांचा त्रिफळा उडवला. जलद माऱ्यानंतर रोहितने फिरकीपटूंना आणले आणि कुलदीप यावदने अप्रतिम चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरचा ( १०) त्रिफळा उडवला. इंग्लंडचा निम्मा संघ १५.१ षटकांत ५२ धावांवर तंबूत परतला.
तत्पूर्वी, शुबमन गिल ( ९), विराट कोहली ( ०) आणि श्रेयस अय्यर ( ४) माघारी परतल्याने भारताची अवस्था ३ बाद ४० अशी झाली होती. रोहित शर्मा व लोकेश राहुल ( ३८) यांनी चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रोहितसह सूर्यकुमार यादवने ( ४९) ३३ धावांची भागीदारी केली. रोहित १०१ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८७ धावांवर झेलबाद झाला. जसप्रीत बुमराहने ( १६) चांगला खेळ करताना संघाला ९ बाद २२९ धावांपर्यंत पोहोचवले. डेव्हिड विलीने ३, तर ख्रिस वोक्स व आदील राशीद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.