ICC ODI World Cup AUS vs NZ Live : धर्मशाला स्टेडियमवर आज चाहत्यांना क्रिकेटचा मनमुराद आस्वाद लुटता आला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३८८ धावांचा डोंगर उभा केला. यानंतर ही मॅच एकतर्फी होईल असाच अंदाज होता, पण समोर न्यूझीलंडचा संघ असताना सर्व अंदाज चुकतात हे खरंय... पहिल्या १० षटकांत दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतरही किवींनी जबरदस्त संघर्ष केला. रचिन रवींद्रच्या शतकाने ऑस्ट्रेलियाला तव्यावर ठेवले होते. त्याने कागांरूंच्या हातातून मॅच खेचून आणलीच होती. पण, सूर गवसलेला ऑस्ट्रेलियन सहजासहजी हार मानणारा नव्हता आणि त्यांनी सामना खेचून आणला.
सचिन तेंडुलकरनंतर फक्त रचिन रवींद्र.... वन डे वर्ल्ड कपमधील असा पराक्रम या दोघांच्या नावावर
ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडने तोडीततोड उत्तर दिले. डेव्हॉन कॉनवे ( २८) व विल यंग ( ३२) यांनी पहिल्या विकेटसाठी ७.२ षटकांत ६१ धावा चोपल्या. या दोघांना जोश हेझलवूडने माघारी पाठवले. न्यूझीलंडने १० षटकांत ७३ धावांवर दोन्ही सलामीवीर गमावले. पण, डॅरील मिचेल ( ५४) आणि रचिन रवींद्र यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी करून संघर्ष सुरू ठेवला होता. रवींद्र आणि कर्णधार टॉम लॅथम ( २१) यांनी ४३ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. रवींद्रने तुफान फटकेबाजी करून ७७ चेंडूंत वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरे शतक पूर्ण केले. पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने स्वतःच्याच गोलंदाजीवर रवींद्रचा सोपा झेल टाकला. पण, ग्लेन फिलिप्सला ( १२) बाद करण्यात मॅक्सवेल यशस्वी ठरला. न्यूझीलंडला विजयासाठी ६० चेंडूंत ९७ धावांची गरज असताना पॅट कमिन्सने मोठी विकेट मिळवून दिली. रवींद्र ८९ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह ११६ धावांवर सीमारेशेवर लाबुशेनच्या हाती झेल देऊन परतला. मिचेल सँटनरही ( १२) झम्पाच्या गोलंदाजीवर आऊट झाला. मॅट हेन्री आणि जिमी निशॅम यांच्यावर मदार होती. हेन्रीला ९ धावांवर कमिन्सने माघारी पाठवले. निशॅम उभा राहिला आणि त्याचे फटके पाहून ऑसी चाहत्यांचं टेंशन वाढलं. १२ चेंडूंत ३२ धावा किवींना करायच्या होत्या आणि ट्रेंट बोल्टचा झेल घेताना लाबुशेन सीमारेषेला चिकटला अन् षटकार मिळाला. निशॅमने पुढे फटके खेचून ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि मॅच ६ चेंडूंत १९ धावा अशी जवळ आणली.
षटकांची गती संथ राखल्याने ऑस्ट्रेलियाला ३० यार्डच्या आत ५ खेळाडूंना ठेवावे लागले. बोल्टने एक धाव काढून निशॅमला स्ट्राईक दिली. स्टार्कचा दुसरा चेंडू वाईड+ चौकार गेला अन् ५ चेंडू १३ धावा असा सामना जवळ आला. त्यानंतर निशॅमने २,२,२ धावा काढल्या. ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांना दाद द्यायला हवी त्यांनी दोन चौकार अडवले. आता २ चेंडू ७ धावा हव्या होत्या आणि २ धाव घेण्याच्या प्रयत्नात निशॅम रन आऊट झाला. त्याने ३९ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारासह ५८ धावांची खेळी केली. १ चेंडूंत ६ धावा हव्या असताना किवींना १ धाव घेता आली आणि ऑस्ट्रेलियाने ५ धावांनी सामना जिंकला. त्यांनी ९ बाद ३८३ धावांपर्यंत मजल मारली.
तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नर ( ८१) व ट्रॅव्हिस हेड ( १०९) यांनी धर्मशालाच्या मैदानावर वादळ आणले आणि पहिल्या विकेटसाठी ११७ चेंडूंत १७५ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या विकेटनंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले होते. मिचेल सँटनरने ऑसींच्या मिचेल मार्श ( ३६) आणि मार्नस लाबुशेन ( १८) यांना माघारी पाठवले. पण, जोश इंग्लिस ( ३८) , ग्लेन मॅक्सवेल ( ४१) व पॅट कमिन्स ( ३७) यांनी अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी केली. कमिन्स व इंग्लिस यांनी २२ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने ४९.२ षटकांत सर्वबाद ३८९ धावा केल्या. ग्लेन फिलिप्स ( ३-३७), ट्रेंट बोल्ट ( ३-७७) आणि मिचेल सँटनर ( २-८०) यांनी धक्के दिले.