सध्या भारतामध्ये आयपीएलची धुमधाम सुरू आहे. तर दुसरीकडे जागतिक क्रिकेटला आता पुढील वर्षी होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे वेध लागले आहेत. २०२७ साली होणारी ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये आयोजित होणार आहे. सुमारे २४ वर्षांनंतर आफ्रिकेमध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धा रंगणार असून, मागच्या विश्वचषकांच्या तुलनेत ही स्पर्धा अनेक बदलांसह खेळवण्यात येणार असल्याने ती अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
या विश्वचषक स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे आफ्रिकेत होणाऱ्या या स्पर्धेत २००३ साली खेळवल्या गेलेल्या फॉरमॅटचं पुनरागमन होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे. २०२७ साली होणारी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही तीन प्रमुख बदलांसह खेळवली जाणार आहे. यातील पहिला मोठा बदल आहे तो म्हणजे २०२७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर ६ या प्रकाराचं पुनरागमन होणार आहे. याआधी १९९९ आणि २००३ साली झालेल्या क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीपूर्वी आणि साखळी फेरी नंतर सुपर ६ फेरी खेळवली गेली होती.
स्पर्धेतील दुसरा मोठा बदल असणार आहे तो म्हणजे २०२७ साली होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत १४ संघ सहभागी होणार आहेत. २०१९ आणि २०२३ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत केवळ १० संघ खेळले होते. त्यामुळे आता संघांची संख्या वाढणार असल्याने स्पर्धेतील रोमांचही वाढणार आहे. तर स्पर्धेतील तिसरा महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे संघाना उपांत्य फेरी गाठण्यासाठी वाढवण्यात आलेली चुरस हा होय.
२०२७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये एकूण १४ संघ सहभागी होणार असून, हे संघ प्रत्येकी ७ असे दोन गटात विभागले जातील. तसेच गटसाखळीमध्ये प्रत्येक संघ ६ सामने खेळेल. तसेच दोन्ही गटांमधून टॉपचे प्रत्येकी ३ संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील. सुपर सिक्समध्ये एका गटातून आलेले संघ दुसऱ्या गटातील संघांविरोधात सामने खेळणार आहेत. एकाच गटातून आलेले संघ मात्र एकमेकांविरोधात खेळणार नाहीत. सुपर सिक्स फेरीत जे संघ पहिल्या चार स्थानांवर राहतील ते संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. तर २ संघ बाद होतील. त्यानंतर उपांत्य फेरीत पहिल्या क्रमांकावर राहणारा संघ चौथ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघासोबत खेळेल. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघ आमनेसामने येतील.
Web Summary : The 2027 Cricket World Cup, hosted in Africa, revives the Super Six format. Fourteen teams will compete, divided into two groups. The top three from each group advance to the Super Six stage, followed by the semi-finals, increasing the competition.
Web Summary : अफ्रीका में आयोजित 2027 क्रिकेट विश्व कप, सुपर सिक्स प्रारूप को पुनर्जीवित करता है। चौदह टीमें प्रतिस्पर्धा करेंगी, जिन्हें दो समूहों में विभाजित किया गया है। प्रत्येक समूह से शीर्ष तीन सुपर सिक्स चरण में आगे बढ़ेंगे, उसके बाद सेमीफाइनल होगा, जिससे प्रतिस्पर्धा बढ़ेगी।