Join us  

SA vs AUS Live : क्विंटन डी कॉकचे विक्रमी शतक; द. आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाची धुलाई, उभं केलंय तगडं लक्ष्य 

ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live : स्फोटक फलंदाजांची तगडी फौज घेऊन मैदानावर उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दादागिरी पाहायला मिळतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 5:46 PM

Open in App

ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live : स्फोटक फलंदाजांची तगडी फौज घेऊन मैदानावर उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दादागिरी पाहायला मिळतेय. श्रीलंकेविरुद्ध चारशेपार धावांचा डोंगर उभा करणाऱ्या आफ्रिकेने आज माजी विजेत्या ऑस्ट्रेलियालाही झोडपून काढले. क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock )ने सलग दुसरे शतक झळकावले आणि एडन मार्करमने पुन्हा एकदा वादळी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेने चांगली फटकेबाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर तगडे आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण आज बरेच गचाळ झाले. त्यांनी ४-५ झेल सोडले. 

SA vs AUS Live : विचित्र विकेट! क्विंटन डी कॉकला नको तो शॉट सूचला, स्वतःनेच स्वतःचा 'दांडा' उडवला, Video 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन आणि बवुमा यांनी १०८ धावांची सलामी दिली. दोन जीवदान मिळालेल्या बवुमाला ( ३५) अखेर ग्लेन मॅक्सवेलने बाद केले.त्यानंतर व्हॅन डेर ड्यूसेन ( २६) चांगला खेळला, परंतु अॅडम झम्पाने त्याचा अडथळा दूर केला. क्विंटनने ९० चेंडूंत शतक पूर्ण केले. मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा मोह त्याला नडला. त्याच्या बॅटचा अन् चेंडूचा संपर्कच झाला नाही आणि चेंडू त्याच्या हाताला लागून यष्टिंवर आदळला. मॅक्सवेलला आयती विकेट मिळाली. क्विंटन १०६ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह १०९ धावांवर बाद झाला. मॅक्सवेलने १० षटकांत ३४ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. 

एडन मार्करम आणि हेनरिच क्लासेन ही जोडी क्लासच आहे. या दोघांनी पुन्हा एकदा आपला दम दाखवताना ऑसी गोलंदाजांना हैराण केले. मार्करम त्याच्या नेहमीच्या आक्रमक शैलीतच खेळताना दिसला. त्याने मागील सामन्यातही शतक झळकावले होते आणि आज त्याने ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. झम्पाच्या १०व्या षटकात मार्करमने सलग ३ चौकार खेचले. झम्पाने १० षटकांत सर्वाधिक ७० धावा देताना १ विकेट घेतली. पॅट कमिन्सच्या चेंडूवर बाजूला जाऊन बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात मार्कराम झेलबाद झाला. त्याने ४४ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५६ धावा केल्या. हेझलवूडने मोक्याच्या क्षणी विकेट मिळवली आणि क्लासेन २९ धावांवर बाद झाला. 

मार्को यानसनने अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून आफ्रिकेला ७ बाद ३११ धावांपर्यंत पोहोचवले. ४९व्या षटकात स्टार्कने डेव्हिड मिलरचा झेल टाकला. त्याच षटकात मार्कस स्टॉयनिसने आणखी एक सोपा झेल सोडला. ५०व्या षटकात यानसेनचा ( २६) झेल घेण्यात वॉर्नरला यश आले. मिटेस स्टार्कने अखेरच्या षटकांत दोन विकेट्स घेतल्या.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपक्विन्टन डि कॉकद. आफ्रिकाआॅस्ट्रेलियाग्लेन मॅक्सवेल