आयसीसीने नुकत्याच जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारतीय गोलंदाजाचा दबदबा कायम असल्याचे दिसून येत आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आजही अव्वल क्रमांकावर कायम आहे. तर, युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यानेही मोठी झेप घेत टॉप-१० च्या दिशेने दमदार वाटचाल सुरू केली आहे.
जसप्रीत बुमराहचे सध्याचे रेटिंग ८८५ असून दुसर्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडाचे ८५१ रेटिंग आहेत. बुमराह आणि दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजामध्ये बरेच अंतर आहे. सध्या बुमराह हा अव्वल १० मध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय गोलंदाज आहे.
:
क्रमांक | खेळाडूचे नाव | देश | रेटिंग पॉईंट्स |
१ | जसप्रीत बुमराह | भारत | ८८५ |
२ | कागिसो रबाडा | दक्षिण आफ्रिका | ८५१ |
३ | मॅट हेन्री | न्यूझीलंड | ८४६ |
४ | पॅट कमिन्स | ऑस्ट्रेलिया | ८३८ |
५ | जोश हेझलवूड | ऑस्ट्रेलिया | ८१५ |
६ | नोमान अली | पाकिस्तान | ८०६ |
७ | स्कॉट बोलँड | ऑस्ट्रेलिया | ७८४ |
८ | नॅथन लायन | ऑस्ट्रेलिया | ७६९ |
९ | मार्को जॅन्सेन | दक्षिण आफ्रिका | ७६७ |
१० | मिचेल स्टार्क | ऑस्ट्रेलिया | ७६६ |
११ | गस अॅटकिन्सन | इंग्लंड | ७६६ |
१२ | मोहम्मद सिराज | भारत | ७१८ |
मोहम्मद सिराजची ऐतिहासिक झेप
वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील शानदार कामगिरीमुळे मोहम्मद सिराजने क्रमवारीमध्ये मोठी झेप घेतली आहे. सिराजने यावेळी तीन स्थानांची झेप घेतली असून तो आता १२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे सध्याचे रेटिंग ७१८ आहे, जे त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वोच्च रेटिंग आहे. सिराजने हाच फॉर्म कायम ठेवल्यास, तो लवकरच टॉप-१० मध्ये स्थान निश्चित करू शकतो.
अहमदाबाद कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी
वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी केली. पहिल्या डावात सिराजने १४ षटकांत केवळ ४० धावा देत चार महत्त्वाचे विकेट्स घेतले. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने ११ षटकांत ३१ धावा दिल्या. मात्र, त्याला यश मिळाले नाही. अन्यथा त्याने आधीच टॉप-१० मध्ये स्थान निश्चित केले असते. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यातही सिराज आपली जादू कायम ठेवेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.