Join us  

अमेरिकेचा ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; टीम इंडिया पाचव्या स्थानी 

अमेरिका क्रिकेट संघाने मंगळवारी ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पहिल्या विजयाची नोंद करताना वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 1:15 PM

Open in App

अमेरिका : अमेरिका क्रिकेट संघाने मंगळवारी ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पहिल्या विजयाची नोंद करताना वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. कायमन आयलंड संघाविरुद्धच्या या सामन्यात अमेरिकेने डकवर्थ लुईस नियमानुसार 10 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात कायमन आयलंड संघाने संपूर्ण 20 षटकं खेळून काढताना 8 बाद 68 धावा केल्या. प्रत्युत्तरात अमेरिकेने 15 षटकांत 5 बाद 60 धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे सामना पुन्हा खेळवण्यात आला नाही आणि डकवर्थ लुईस नियमानुसार अमेरिकेने हा सामना जिंकला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 20 षटकं खेळूनही धावांचा निचांक धावसंख्येचा नकोसा विक्रम कायमन आयलंडच्या नावावर नोंदवला गेला. अमेरिकेच्या गोलंदाजांनी त्यांना 20 षटकांत 8 बाद 68 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. कायमनकडून ल्युक हॅरींग्टन-मायर्सने सर्वाधिक नाबाद 17 धावा केल्या. अमेरिकेच्या स्टीव्हन टेलर ( 2/10), निसर्ग पटेल ( 2/17), तिमिल पटेल ( 2/9) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात स्टीव्हन टेलरने (17) व अॅरोन जोन्स ( 16*) यांनी दमदार खेळ केला. कायमनच्या ल्युकने 13 धावांत 2 विकेट्स घेतल्या. 

कायमन आयलंड संघाने 20 षटकांत 8 बाद 68 धावांची खेळी करून नकोसा विक्रम नावावर नोंदवला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये संपूर्ण 20 षटकं खेळूनही नोंदवलेली ही निचांक खेळी ठरली. 2008 मध्ये कॅनडानं बेलफास्ट येथील सामन्यात बर्म्युडाला 20 षटकांत 10 बाद 70 धावांत रोखले होते. त्यानंतर हाँगकाँगने 2014च्या कोलंबो येथील सामन्यात नेपाळला 20 षटकांत 10 बाद 72 धावांत, तर 2010 मध्ये झिम्बाब्वेने पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजला 7 बाद 79 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले होते. या क्रमवारीत भारत पाचव्या स्थानी येतो. टीम इंडियाने 2016मध्ये मिरपूर येथे संयुक्त अरब अमिरातीला 20 षटकांत 9 बाद 81 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले होते.   

टॅग्स :आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020अमेरिकाभारतीय क्रिकेट संघआयसीसी