ICC Men's T20 World Cup Africa Qualifier - अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पुढल्या वर्षी खेळवण्यात येणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील वीसावा ( २०) संघ आज ठरणार आहे. आफ्रिका विभागातील पात्रता फेरीतून नामिबियाने सलग पाच सामने जिंकून वर्ल्ड कपचे तिकीट पटकावले. आता एका जागेसाठी झिम्बाब्वे, केनिया आणि युगांडा हे तीन देश शर्यतीत आहेत. पण, आज क्रिकेटच्या इतिहासात मोठा चमत्कार होण्याची अपेक्षा आहे आणि त्यामागे कारणही तसेच आहे.
नामिनिबायने ५ पैकी ५ सामने जिंकून आपले स्थान पक्के केले आहे. आफ्रिका विभागातून दोन संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत आणि त्यापैकी १ जागा शिल्लक आहे. आज युगांडा विरुद्ध रवांडा, झिम्बाब्वे विरुद्ध केन्या आणि नायजेरिया विरुद्ध नामिबिया अशा तीन लढती होणार आहेत. यापैकी युगांडा व झिम्बाब्वे यांच्याततल्या लढती महत्वाच्या आहेत. युगांडा संघाने साखळी फेरीत झिम्बाब्वेवर विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली होती आणि आज तेच झिम्बाब्वेच्या मार्गात अडथळा बनून उभे राहिले आहेत.
पात्र ठरलेले १९ संघ...अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया
स्पर्धेचा फॉरमॅट...२० संघांची प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी केली जाईल. चारही गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील. त्यानंतर ४-४ अशा दोन गटांत त्यांची विभागणी होईल आणि दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील. त्यानंतर उपांत्य फेरी व फायनल असा सामना होईल.