दुबई : चेंडू छेडछाडप्रकरणी दोषी आढळलेल्या खेळाडूवर आता ६ कसोटी किंवा १२ वन-डे सामन्यांची बंदी लागू शकते, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आता याचा लेव्हल तीनच्या अपराधामध्ये समावेश केला आहे. मैदानावरील वर्तन निश्चित करण्यासाठी आता या यादीमध्ये असभ्यपणा आणि वैयक्तिक गैरवर्तन याचाही समावेश केला आहे. डबलिनमध्ये वार्षिक बैठकीच्या अखेर आयसीसीने मैदानावरील गैरवर्तन रोखण्यासाठी आपली योजना सादर केली.
यंदा मार्च महिन्यात केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व कॅमरन बेनक्राफ्ट चेंडूला आकार बदलण्याप्रकरणी दोषी आढळले होते. त्यानंतर चेंडू छेडछाड हा गुन्हा लेव्हल दोनवरून लेव्हल तीनमध्ये हलविण्यात आला.
आयसीसी चेअरमन शशांक मनोहर म्हणाले, ‘मी व बोर्डाच्या माझ्या सहकारी संचालकांचे खेळात चांगल्या वर्तनासाठी क्रिकेट समिती व मुख्य कार्यकारिणी समितीच्या शिफारशींचे समर्थन करण्यासाठी एकमत होते. आपल्या खेळ वर्तनाबाबत सर्वोच्च स्थानी असावा यादृष्टीने खेळाडू व प्रशासकांना रोखण्यासाठी काही कडवे पाऊल उचलणे आवश्यक आहे.’
मार्चमध्ये लागू असलेल्या आचारसंहितेनुसार आयसीसीने आॅसी कर्णधार स्टीव्ह स्मिथवर एका कसोटी सामन्याची बंदी घातली होती. त्यानंतर या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेचे प्रावधान असावे, अशी मागणी होत होती. (वृत्तसंस्था)
आयसीसीच्या वक्तव्यानुसार जर खेळाडू किंवा सहायक स्टाफला अपील करायचे असेल तर त्यांना अपील शुल्क पूर्वीच प्रदान करावे लागेल. अपील योग्य असल्याचे सिद्ध झाल्यास शुल्क परत करण्यात येईल. यष्टीमधील मायक्रोफोनबाबत असलेल्या निर्देशांमध्येही बदल करण्यात आला आहे. त्यात कुठल्याही क्षणी स्टम्प मायक्रोफोन आॅडिओच्या प्रसारणास मंजुरी राहील.
गेल्या महिन्यात श्रीलंकेचा कर्णधार
दिनेश चांदीमलवर सेंट ल्युसियामध्ये
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत चेंडू
छेडछाड प्रकरणात एका कसोटी सामन्याची बंदी घालण्यात आली.
आॅस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार स्मिथला आयसीसीतर्फे कठोर शिक्षा मिळाली नसली, तरी आॅस्ट्रेलियाने या प्रकरणात स्मिथ व वॉर्नर यांच्यावर प्रत्येकी एक वर्षाची बंदी घातली तर बेनक्राफ्टवर नऊ महिने निलंबनाची कारवाई केली.
आयसीसी बोर्डाने वैयक्तिक गैरवर्तन (लेव्हन दोन, तीन), असभ्यपणा (लेव्हल वन) आणि पंचांच्या निर्देशांचे पालन न करणे (लेव्हल वन) या गुन्ह्यांचाही यादीमध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे.
आयसीसी व्यवस्थापन आता झिम्बाब्वे क्रिकेटला सहकार्य करणार आहे.
तेथील क्रिकेट, व्यवस्थापन व आर्थिक व्यवस्थापनासाठी योजना तयार करण्यात येणार असून, त्याची आयसीसीतर्फे नियमित समीक्षा होईल.