India T20 World Cup Squad : भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला दुखापतीमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. BCCI ने अद्यापही त्याच्या जागी संघात कोणाला संधी मिळेल हे जाहीर केलेले नाही. पण, आज त्यांना काही करून हे नाव जाहीर करावे लागणार आहे, कारण ICC ची अंतिम तारीख आज संपतेय. मोहम्मद शमी व दीपक चहर हे या शर्यतीत आघाडीवर आहेत, परंतु त्यांनी अद्यापही फिटनेस टेस्ट ( तंदुरुस्ती चाचणी) पास केलेली नाही. या दोघांचाही वर्ल्ड कप संघासाठीच्या राखीव खेळाडूंमध्ये समावेश केला गेला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी शमीला कोरोना झाला आणि त्याला माघार घ्यावी लागली. त्यानंतर त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, परंतु अद्यापही फिटनेसच्या बाबतीत साशंकता आहेच. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी दीपक चहरची पाठ दुखावली आणि त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली. आता दोघांनाही NCA मध्ये तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागणार आहे. त्यानंतरच बीसीसीआय अंतिम निर्णय घेईल आणि BCCI कडे आजचाच दिवस आहे.
- संघातील खेळाडूची रिप्लेसमेंट जाहीर करण्याचा आज शेवटचा दिवस आहे
- ऑक्टोबर १५ पर्यंत संघांना त्यांच्या ताफ्यात बदल करता येईल, परंतु त्यासाठी आयसीसीची परवानगी घ्यावी लागेल.
- बीसीसीआय निवड समिती आज जसप्रीत बुमराहच्या रिप्लेसमेंटची घोषणा करू शकतात
- मोहम्मद शमी मागील आठवड्यात फिटनेस टेस्टसाठी NCA मध्ये दाखल झाला आहे
- दीपक चहरलाही फिटनेस टेस्ट द्यावी लागेल, परंतु सध्या त्याला विश्रांतीचा सल्ला दिला गेला आहे
''दीपक चहर हा फिटनेस टेस्ट देण्याच्या परिस्थितीत नाही. तो NCA मध्ये आहे आणि तेथे त्याच्या दुखापतीवर उपचार सुरू आहेत. त्याला विश्रांतीचा सल्ला दिला गेला आहे. शमी तंदुरूस्त झाला आहे आणि वर्ल्ड कपला जाण्यासाठी सज्ज आहे, ''असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
आयसीसीच्या नियमानुसार ९ ऑक्टोबरपर्यंत सहभागी संघांना त्यांच्या मुख्य संघात बदल करता येणार आहे, मग त्यासाठी दुखापत हेच कारण असायला हवं असं नाही. मात्र, त्यानंतर बदल करायचा असेल तर संघांना आयसीसीची परवानगी घ्यावी लागेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"