Join us

तेव्हा २१३ आता २१२! ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये होणार १९९९ची पुनरावृत्ती? 

ICC CWC 2023, SA Vs Aus: अत्यंत वाईट सुरुवातीनंतर डेव्हिड मिलरने ठोकलेल्या झुंजार शकताच्या दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २१३ धावांच आव्हान ठेवलं आहे. मात्र या सामन्यामध्ये एक अजब योगायोग दिसून येत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 18:58 IST

Open in App

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा डाव २१२ धावांवर आटोपला आहे. अत्यंत वाईट सुरुवातीनंतर डेव्हिड मिलरने ठोकलेल्या झुंजार शकताच्या दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २१३ धावांच आव्हान ठेवलं आहे. मात्र या सामन्यामध्ये एक अजब योगायोग दिसून येत आहे. 

१९९९ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमने-सामने आले होते. तेव्हा तो सामना टाय झाला होता. ऑस्ट्रेलियाला २१३ धावांत गुंडाळल्यानंतर शेवटच्या षटकात ४ चेंडूत २ धावांची गरज असताना चौथ्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा फलंदाज धावबाद झाला होता. मग सुपरसिक्समधील कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता.

या सामन्यातील योगायोग म्हणजे तेव्हा ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ४९.४ षटकांत २१३ धावांवर आटोपला होता. तर आज दक्षिण आफ्रिकेचा डाव प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकांमध्येच २१२ धावांवर आटोपला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २१३ धावा काढाव्या लागणार आहेत. त्यामुळे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या लढतीत १९९९ च्या निकालाची पुनरावृत्ती होणार का? याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.

दरम्यान, आज उपांत्य सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी निराशा केली. एका पाठोपाठ एक गडी बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव अडखळला. त्यानंतर डेव्हिड मिलरने एक बाजू लावून धरत केलेल्या शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिलेका दोनशेपार मजल मारता आली. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपआॅस्ट्रेलियाद. आफ्रिका