ठळक मुद्देराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही विजय मिळवला होता.
नवी दिल्ली - दुस-या कसोटी सामन्यातही दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव झाला असला तरी भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयसीसीच्या प्रतिष्ठेच्या 'क्रिकेटर ऑफ द इयर' तसेच वनडेमधल्या सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी विराटची निवड झाली आहे. आयसीसीच्या कसोटी आणि वनडे संघाच्या कर्णधारपदीही विराटची निवड करण्यात आली आहे.
भारताची रनमशीन असलेल्या विराटने वनडेमध्ये 26 डावात 76.84 च्या सरासरीने 1460 धावा केल्या आहेत.
यात सहा शतकांचा समावेश आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती तसेच इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्या.
बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही विजय मिळवला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणा-या खेळाडूंच्या यादीत कोहली दुस-या स्थानावर आहे. मागच्यावर्षीच त्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकले. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मागच्या वर्षभरात वनडेमध्ये चांगले यश मिळवले आहे. कोहली आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये 889 पॉईंटसह अव्वल स्थानावर आहे.