भारतीय क्रिकेट नियमाक मंडळानं ( BCCI) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप भारताऐवजी यूएईत खेळवण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( ICC) कळवल्यानंतर मंगळवारी आयसीसीनं याबाबतची घोषणा केली. आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याची अधिकृत घोषणा आयसीसीनं केली. या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क बीसीसीआयकडेच राहणार असल्याचेही आयसीसीनं स्पष्ट केले. ही स्पर्धा भारतात होणार होती, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे स्पर्धा हलवण्यात आली. बीसीसीआयनं या निर्णयासाठी आयसीसीकडे २८ जूनपर्यंत मुदत मागितली होती आणि बीसीसीआयनं सोमवारी याबाबतचा निर्णय आयसीसीला कळवला.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने चार स्टेडियमवर होतील. दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायेद स्टेडियम, अबु धाबी, शाहजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी ग्राऊंड येथे सामने होतील. आठ पात्र संघांमध्ये होणाऱ्या पहिल्या फेरीचे सामने ओमान आणि युएई येथे होतील. यातून चार संघ सुपर १२ साठी पात्र ठरतील.
२०१६ साली वेस्ट इंडिज संघानं इंग्लंडला नमवून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला होता, त्यानंतर होणारी ही पहिलीच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा आहे. . बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पपुआ न्यू गिनी यापैकी चार संघ सुपर १२ मध्ये प्रवेशासाठी खेळतील. आयसीसी क्रमवारीत अव्वल ८ क्रमांकावर असलेले संघ आधीच सुपर १२साठी पात्र ठरलेले आहेत. सुपर १२मध्ये ३० सामने होतील आणि २४ ऑक्टोबरला या सामन्यांची सुरुवात होईल. सुपर १२ संघांची दोन गटांत विभागणी केली जाईल आणि त्यांचे सामने दुबई, अबु धाबी आणि शाहजाह या तीन मैदानावर होतील. त्यानंतर तीन प्ले ऑफ सामने, दोन सेमी फायनल व एक फायनल अशी स्पर्धा पुढे सरकेल.
''सुरक्षित वातावरणात स्पर्धेचे आयोजन करण्यास आमचे प्राधान्य आहे. ही स्पर्धा भारतात झाली असती तर आम्हाला आनंदच झाला असता, परंतु सद्यस्थितीत ते शक्य नाही. बीसीसीआय, अमिराती क्रिकेट बोर्ड आणि ओमान क्रिकेट यांच्याशी आम्ही स्पर्धा आयोजनाबाबत सकारात्मक चर्चा करत आहोत,''असे आयसीसीचे CEO जॉफ अलार्डीस यांनी सांगितले.