गॉल : युवा यष्टिरक्षक महिला फलंदाज तानिया भाटियाची यष्टिपुढे व यष्टिमागे चमकदार कामगिरी आणि कर्णधार मिताली राजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये गुरुवारी येथे खेळल्या गेलेल्या चुरशीच्या दुसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीत ७ धावांनी विजय मिळवला व मालिकेत विजयी आघाडी घेतली.
कारकिर्दीतील केवळ दुसरा सामना खेळत असलेल्या २० वर्षीय तानियाने ६६ चेंडूंना सामोरे जाताना ६८ धावांची खेळी केली तर मितालीसोबत (१२१ चेंडू, ५२ धावा) पाचव्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी करीत भारताचा डाव सावरला. या दोघींव्यतिरिक्त दयालन हेमलताने ३१ चेंडूंना सामोरे जाताना ३५ धावांची आक्रमक खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत २१९ धावा फटकावल्या.
प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेचा डाव ४८.१ षटकांत २१२ धावांत संपुष्टात आला. श्रीलंकेतर्फे कर्णधार चमारी अटापट्टूने ५७, शशिकला श्रीवर्धनेने ४९ आणि नीलाक्षी डिसिल्वाने ३१ धावांचे योगदान दिले. भारतातर्फे मानसी शर्माने ५१ धावांच्या मोबदल्यात ३ आणि राजेश्वरी गायकवाडने ३७ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. श्रीलंकेला अखेरच्या चार षटकांमध्ये विजयासाठी १७ धावांची गरज होती आणि त्यांच्या ३ विकेट शिल्लक होत्या, पण भारताने तीन षटकांत तीन बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजय आघाडी घेतली. तानियाने यात दोन बळी घेतले.
त्याआधी, भारताची सुरुवात निराशाजनक झाली. पूनम राऊत (४), स्मृती मानधना (१४), हरमनप्रीत कौर (७) आणि दीप्ती शर्मा (१२) यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे संघाची ४ बाद ६६ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मिताली व तानिया यांनी डाव सावरला. तानियाने आपल्या खेळीत ९ चौकार लगावले. उभय संघांदरम्यान तिसरा व अखेरचा वन-डे सामना १६ सप्टेंबर रोजी कातुनायके येथे खेळल्या जाणार आहे. (वृत्तसंस्था)