ICC Champions Trophy Squad For Team India : खराब फॉर्ममध्ये असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताच्या एकदिवसीय संघात कायम राहणार असले तरी किमान चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडताना तीन वरिष्ठ खेळाडूंची निवड डोकेदुखी ठरू शकते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वरिष्ठ खेळाडूंच्या निवडीवर डोकेदुखी
लोकेश राहुल, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांची १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसीच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड निश्चित मानली जात नाही. हे तिघेही मागच्या वर्षी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत खेळले होते. अंतिम सामन्यानंतर भारताने सहा एकदिवसीय सामने खेळले. त्यात जडेजा आणि शमी यांना विश्रांती देण्यात आली. मात्र राहुल हा दक्षिण आफ्रिका तसेच श्रीलंकेविरुद्ध मालिकांमध्ये खेळला. राहुलला लंकेविरुद्ध मालिकेच्या मध्येच बाहेर करण्यात आले होते. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात राहुलने अर्धशतकासाठी शंभराहून अधिक चेंडू खेळले होते.
यशस्वी जैस्वाल याला वन डे संघात स्थान मिळण्याचे संकेत
आघाडीच्या चार फलंदाजांमध्ये एक डावखुरा फलंदाज असावा, या दृष्टीने यशस्वी जैस्वाल याला वन डे संघात स्थान देण्याचे संकेत मिळाले आहेत. ऋषभ पंत यष्टिरक्षणासाठी पहिली पसंत असेल; तर राहुलला बॅकअप ठेवण्यात अर्थ नाही. राहुल यष्टिरक्षण करणार नसेल तर केवळ फलंदाज म्हणून संघात स्थान मिळणार नाही. इशान किशनने विजय हजारे करंडकात धावा काढल्या नाहीत. संजू सॅमसन याला सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर राहिल्यानंतर केरळने त्याला नंतरच्या सामन्यासाठी निवडले नव्हते. गौतम गंभीरचे वजन कायम असल्यास सॅमसन पसंतीचा खेळाडू म्हणून संघात दिसू शकेल.
जडेजाच्या जागी अक्षरला पहिली पसंती?
भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपले सामने दुबईत खेळायचे आहेत. बांगलादेशविरुद्ध पहिला सामना २० फेब्रुवारीला असेल. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. पांढऱ्या चेंडूवर जडेजा तितका प्रभावी वाटत नाही. निवड समिती अक्षर पटेलला उत्कृष्ट पर्याय मानते. वॉशिंग्टन सुंदरची निवड देखील निश्चित मानली जाते; मात्र कुलदीप यादवच्या फिटनेसकडे लक्ष असेल. कुलदीप नसेल, तर रवी बिश्नोई किंवा वरुण चक्रवर्ती यांना संधी असेल.
शमीच्या तंदुरुस्तीचं काय?
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या तंदुरुस्तीविषयी निवड समितीकडे स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. विजय हजारे चषक स्पर्धेच्या दोन सामन्यांत त्याने आठ षटके गोलंदाजी केली. जसप्रीत बुमराह पाठदुखीमुळे स्पर्धेला मुकल्यास शमीचा अनुभवी संघासाठी हितावह ठरणार आहे. राखीव फलंदाज रिंकू सिंग आणि तिलक वर्मा हे देखील चांगले पर्याय आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावेदार
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती किंवा रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, आवेश खान किंवा मोहम्मद शमी, रिंकू सिंग किंवा तिलक वर्मा.