भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महत्त्वपूर्ण लढतीत विराट कोहलीनं पुन्हा एकदा आपल्या भात्यातील फटकेबाजीचा खास नजराणा पेश केला. विराट कोहलीनं दुबईच्या मैदानात रंगलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात वनडे कारकिर्दीतील आपलं ७४ वे अर्धशतक झळकावले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सहाव्या षटकातच त्याच्यावर मैदानात उतरण्याची वेळ आली. धावांसाठी संघर्ष करत असलेल्या विराट कोहलीनं पुन्हा एकदा पाकिस्तान विरुद्ध आपला खास अंदाज दाखवून दिला. ६२ चेंडूंत त्याने चार चौकारांसह अर्धशतक साजरे केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! पाक संघाविरुद्ध किंग कोहलीचा जबरदस्त आहे रेकॉर्ड
पाकिस्तानचा संघ नेहमी हिरव्या जर्सीत मैदानात उतरल्याचे पाहायला मिळते. यावेळी पाक संघानं पोपटी छटा असलेली जर्सी निवडली. रंग पण विराट कोहलीनं त्यांना पुन्हा एकदा आपल्या खेळीनं बेरंग केले. पाकिस्तान संघासमोर विराट कोहलीची बॅट नेहमीच तळपली आहे. या संघाविरुद्ध १७ सामन्यांमध्ये ५५ पेक्षा अधिक सरासरीने त्याने ७२५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये तीन शतके आणि तितक्याच अर्धशतकांचा समावेश आहे.
अर्धशतकाआधी गाठला मैलाचा पल्ला
पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक साजरे करण्याआधी कोहलीनं वनडेत जलदगतीने १४ हजार धावांचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. २८७ डावांमध्ये त्याने हा पल्ला गाठला. सचिन तेंडुलकरने हा पल्ला गाठण्यासाठी ३५० वेळा बॅटिंग केली होती. याशिवाय श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ३७८ डावांमध्ये १४ हजारीचा पल्ला गाठला होता. विराट कोहलीने वनडेत ८,०००, ९,०००, १०,०००, ११,०००, १२,०००, १३,००० आणि आता १४,००० धावा जलदगतीने करण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. ही आकडेवारी वनडेतील त्याची बादशाहत दाखवून देणारी आहे.