दुबईच्या मैदानात मोहम्मद शमीनं मैदान सोडल्यावर भारतीय संघ थोडा दबावात असताना हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या मदतीला धावला. तो गोलंदाजीला आला अन् बाबर आझमच्या रुपात त्याने पाकिस्तानला पहिला धक्का दिला. पाकिस्तानच्या डावातील ९ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने बाबर आझमला तंबूचा रस्ता दाखवला. विकेटमागे लोकेश राहुलनं कोणतीही चूक न करता झेल टिपला. बाबर आझम २६ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने २३ धावा करून माघारी फिरला. बाबरची विकेट घेतल्यावर हार्दिक पांड्याने खास अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चौकार मारल्यावर दुसऱ्याच चेंडूवर पांड्यानं बाबरचा खेळ केला खल्लास
पाकिस्तानच्या डावातील सातव्या षटकात रोहित शर्मानं चेंडू हार्दिक पांड्याकडे सोपवला. या षटकात पांड्याने ५ धावा खर्च केल्या. ज्यात बाबर आझमनं त्याला एक खणखणीत चौकारही मारल्याचे पाहायला मिळाले. नवव्या षटकात पांड्या पुन्हा आपलं दुसरं षटक घेऊन आला त्यावेळी बाबर आझमनं चौकार मारून त्याचे 'हार्दिक' स्वागत केले. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर हार्दिकनं त्याचा खेळ खल्लास केला. त्यानंतर पांड्याने सेलिब्रेशन केले तेही लाजवाब होते.
टीम इंडियासह पांड्याची ही विकेट खूप मोलाची, कारण..हार्दिक पांड्यानं ऑफ स्टंप बाहेरील लेंथवर गोलंदाजी करत बाबरला ड्राइव्ह मारण्यास भाग पाडले. बाबरी ड्राइव्ह मारायला गेला अन् तो पांड्याच्या जाळ्यात फसला. सेट झालाय असं वाटत असताना त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. बाबरची विकेट म्हणजे पाकिस्तानचा आत्मविश्वास डळमळीत होणं असं काहीसं समीकरण आहे. त्यामुळे पांड्याने मिळवलेले हे यश खूप मोठ असेच होते.