Virat Kohli 300th ODI : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यासाठी रविवारी (२ मार्च) भारत-न्यूझीलंड संघ दुबईच्या मैदानात एकमेकांना भिडताना दिसेल. दोन्ही संघांनी आधीच सेमीचं तिकीट बूक केले आहे. हा सामना गटात अव्वल राहण्याच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी महत्त्वाचा ठरेल. विराट कोहलीसाठी ही लढत अधिक खास ठरेल. कारण विराट कोहली ३०० वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोहलीसाठी खास अन् अविस्मरणीय क्षण, अनुष्काही होणार त्याची साक्षीदार
विराट कोहलीसाठी खास अन् अविस्मरणीय क्षण अधिक खास करण्यासाठी अनुष्का शर्मानंही दुबईला जाण्याची तयारी केली आहे. या सामन्यात ती दुबई स्टेडियम स्टँडमधून विराट कोहलीला चीअर करताना दिसू शकते. विराट कोहलीनं पाकिस्तान विरुद्ध नाबाद शतकी खेळी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. भारत-पाक हायहोल्टेज सामन्यात रोहितची पत्नी स्टेडियम स्टँडमध्ये दिसली. पण अनुष्काची झलक काही पाहायला मिळाली नव्हती. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच नवरोबाच्या शतकाचा आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. पण आता मात्र तिने दुबईचं फ्लाइट पकडण्याचं ठरवलं आहे. एका मॅचसाठी मिळालेला पास तिने विराट कोहलीच्या 'त्रिशतकी' वनडेसाठी राखून ठेवल्याचे दिसते.
अनुष्कासह विराटचा भाऊही मॅचसाठी दुबईत असणार
बीसीसीआयने भारतीय खेळाडूंच्या कुटुंबियांना एका मॅचची मुभा दिलीये. कोहलीसाठी खास अन् अविस्मरणीय असलेल्या सामन्यात अनुष्का या सवलतीचा फायदा घेणार असल्याचे दिसून येते. अनुष्काशिवाय विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहलीही दुबई स्टेडियमवर हजेरी लावून या सामन्याचा आनंद घेणार असल्याची माहिती वेगवेगळ्या वृत्तातून समोर येत आहे.
त्रिशतकी सामन्यात शतकी डाव साधावा अशीच चाहत्यांची असेल इच्छा
विराट कोहली हा मोठ्या स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करण्यात माहिर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तो फक्त २२ धावांवर बाद झाला होता. पण पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत त्याची बॅट तळपली. त्याच्या भात्यातून वनडेतील ५१ वे शतक पाहायाला मिळाले. आता ३०० वा वनडे सामना त्याने शतकासह खास करावा, अशीच चाहत्यांची इच्छा आहे. या सामन्यात तो कशी कामगिरी करणार ते पाहण्याजो असेल.