आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लढतीत इंग्लंडच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरनं 'फास्टर फिफ्टी'चा खास रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. लाहोरच्या मैदानात रंगलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात तो वनडेत सर्वात जलद ५० विकेट्स घेणारा इंग्लंडचा गोलंदाज ठरला आहे. दिग्गज जलगदती गोलंदाज जेम्स अँडरसनला मागे टाकत त्याने इंग्लंडकडून सर्वात जलद ही कामगिरी करण्याचा पराक्रम करून दाखवला. जेम्स अँडरसन याने ३१ सामन्यात हा टप्पा गाठला होता.
भेदक माऱ्यानं सलामीवीराला चकवा देत जोफ्रानं साधला मोठा डाव
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील लढत रंगली आहे. जो संघ सामना जिंकेल तो स्पर्धेत टिकेल आणि पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर होईल, असे या सामन्याचे समीकर आहे. अफगाणिस्तानच्या संघानं टॉस जिंकून यासामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या डावातील पाचव्या षटकात सलामीवीर रहमानउल्लाह गुरबाझ याला तंबूत धाडत जोफ्रानं वनडेत ५० विकेट्चा पल्ला गाठला. वेगवान चेंडू अफगाणिस्तानच्या सलामीवीराच्या बॅटची कड घेऊन स्टंपवर आदळला अन् जोफ्रानं विक्रमी पल्ला गाठला.
कुणाच्या नावे आहे सर्वात जलदगतीने ५० विकेट घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड?
क्रिकेट जगतात वनडेत सर्वात जलद विकेट घेण्याचा विक्रम हा श्रीलंकेचा माजी फिरकीपटू अजंथा मेंडिस याच्या नावे आहे. त्याने अवघ्या १९ सामन्यात आपल्या खात्यात ५० विकेट्स जमा केल्या होत्या. त्यापाठोपाठ या यादीत नेपाळचा संदीप लामिछाने आहे ज्याने २२ सामन्यात हा डाव साधला होता. आघाडीच्या तीन गोलंदाजांच्या यादीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचा विद्यमान अध्यक्ष आणि माजी मध्यमजलदगती गोलंदाज अजीत आगरकरचा नंबर लागतो. २३ सामन्या त्याने हा पल्ला गाठला होता.
इंग्लंडकडून सर्वात जलद ५० एकदिवसीय बळी टिपणारे गोलंदाज
- जोफ्रा आर्चर - ३० सामने
- जेम्स अँडरसन - ३१ सामने
- स्टीव्ह हार्मिसन - ३२ सामने
- स्टीव्हन फिन - ३३ सामने
- डॅरेन गॉफ - ३४ सामने
क्रिकेट जगतातील सर्वात जलद ५० विकेट्स घेणारे गोलंदाज
- अजंता मेंडिस - १९ सामने
- संदीप लामिछाने - २२ सामने
- अजित आगरकर - २३ सामने
- मिचेल मॅकक्लेनघन - २३ सामने
- डेनिस लिली - २४ सामने