चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील इंग्लंड विरुद्धच्या 'करो वा मरो' अशा लढतीत अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झाद्रान (Ibrahim Zadran) याची बॅट तळपलीये. या पठ्ठानं लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात शतक साजरे केले. या खेळीसह त्याच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या मोठ्या स्पर्धेत शतक झळकवणारा अफगाणिस्तानचा तो पहिला खेळाडू ठरलाय. २०२३ मध्ये भारतात रंगलेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने मुंबईचं मैदान गाजवताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक साजरे केले होते. त्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लाहोरच्या मैदानात कल्ला करत त्याने विक्रमी शतक झळकावले आहे.
अफगाणिस्तानकडून सर्वाधिक सेंच्युरी ठोकणारा दुसरा बॅटर
इब्राहिम झाद्रान याचे वनडेतील हे सहावे शतक आहे. यासह त्याने मोहम्मद शहझाद याच्या विक्रमाची बरोबरी केलीये. अफगाणिस्तानकडून २०१९ मध्ये शेवटची वनडे खेळणाऱ्या मोहम्मद शहजादच्या खात्यातही ६ शतकांची नोंद आहे. अफगाणिस्तानकडून सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रहमनुल्लाह गुरबाझचा टॉपला आहे. त्याने आतापर्यंत ८ शतके झळकावली आहेत.
वनडेत पार केला १५०० धावांचा पल्ला
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ४३ धावा करताच झादरन याने एकदिवसीय कारकिर्दीत १५०० धावांचा टप्पा पार केला. ३५ व्या सामन्यात त्याने ५० हून अधिकच्या सरासरीनं धावा करताना हा टप्पा गाठला आहे. इब्राहिम झरदान याच्या भात्यातून पहिल शतक हे झिम्बाब्वेच्या संघाविरुद्ध आले. २०२२ मध्ये त्याने पहिल्या शतकी खेळीवेळी १२० धावांची नाबाद खेळी साकारली होती. याच वर्षात त्याच्या भात्यातून श्रीलंकेविरुद्ध १०६ आणि १६२ धावांची खेळी आल्याचे पाहायला मिळाले. २०२३ मध्ये त्याने दोन शतके झळकावली होती. यात बांगलादेश विरुद्धच्या १०० धावांच्या खेळीसह मुंबईच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या नाबाद १२९ धावांच्या खेळीचा समावेश आहे.
Web Title: ICC Champions Trophy 2025 ENG vs AFG Ibrahim Zadran Becomes First Afghanistan Batter To Score A Hundred in World Cup And Champions Trophy See Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.