चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर बॅटर बेन डकेट याची बॅट तळपली आहे. शनिवारी, लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर रंगलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्याने वनडे कारकिर्दीतील तिससरे आणि आयसीसी स्पर्धेतील आपल्या पहिले शतक साजरे केले. अवघ्या ४३ धावांवर दोन विकेट्स गमावल्यावर त्याने जो रुटसह संघाचा डाव सावरताना ९५ चेंडूत शतक पूर्ण केले. शतकी खेळी साजरी करताना त्याच्या भात्यातून ११ चौकारासह एक षटकारही पाहायला मिळाला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील चौथ्या सामन्यातील पहिल्या डावात सहावी सेंच्युरी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन विकेट झटपट गमावल्यावर दबावात दमदार खेळ
इंग्लंडच्या संघानं नाणेफेक गमावल्यावर फिलिप सॉल्ट आणि बेन डकेट या जोडीनं संघाच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर १४ अवघ्या १४ धावा असताना सॉल्टनं त्याची साथ सोडली. त्याची जागा घेण्यासाठी आलेला विकेट किपर बॅटर जेमी स्मिथही फार काळ टिकला नाही. संघाच्या धावफलकावर अर्धशतक झळकण्याआधी इंग्लंडच्या ताफ्यातील आघाडीचे दोन फलंदाज तंबूत परतले होते.
जो रुटसोबतच्या शतकी भागीदारीनं सावरला संघाचा डाव
या कठीण परस्थितीत सर्वोत्तम खेळाचा नजराणा पेश करत बेन डकेट याने आपल्यातील क्षमता दाखवून दिला. जेमी स्मिथसोबत ३० धावांची भागीदारी रचल्यावर तिसऱ्या विकेटसाठी जो रूटसोबत त्याने १५८ धावांची दमदार भागीदारी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे खांदे पाडले.
सेट केला वनडेत सर्वात जलदगतीनं १००० धावांचा टप्पा गाठण्याचा रेकॉर्ड
बेन डकेट याने २०१६ मध्ये इंग्लंडकडून वनडे पदार्पण केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीआधी त्याने २० सामन्यात ४६ च्या सरासरीसह ९६६ धावा केल्या होत्या. ज्यात ६ अर्धशतकासह ३ शतकांचा समावेश होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शतकी खेळीसह त्याने वनडेत १००० धावांचा टप्पा पार केला आहे. पीटरनला मागे टाकत आता तो सर्वात जलदगतीने हा पल्ला गाठणारा इंग्लंडचा बॅटर ठरला आहे.