मुंबई : आयसीसीने नुकतेच २०२४ ते २०३१ पर्यंत भविष्यातील वेळापत्रक (एफटीपी) जाहीर केले. त्यात सहा वर्षांत चार टी-२० विश्वचषकाचे आयोजन होणार असून, २० संघांचा सहभाग असेल. यादरम्यान दोन विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा तसेच चॅम्पुयन्स ट्रॉफीचेदेखील आयोजन होईल. हे नेमके कशाचे लक्षण आहे? आयसीसीला असा पवित्रा का घ्यावा लागला.
भारताचा माजी सलामीवीर आणि सध्या समालोचक आकाश चोप्रा याने यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. टी-२० विश्वचषकात २० संघांचा समावेश करण्यामागे आयसीसीने डोमॅस्टिक तसेच फ्रॅन्चायजी टी-२० लीगचे दडपण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला. वन डे विश्वचषकात ५५ सामन्यांचे आयोजन हा देखील आयपीएलला शह देण्याचाच भाग असावा. आयसीसी स्पर्धा यापुढे टी-२० लीगसारखीच खेळविण्यात येईल.
प्रसारणकर्त्यांसाठी मेजवानी
चोप्राने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार आयसीसीने जाहीर केलेल्या आठ वर्षांतील वेळापत्रकाचे प्रसारण हक्क जी कंपनी मिळवेल, ती नक्कीच मालामाल होईल. अर्थात त्यांना यासाठी आपला खिसाही प्रचंड प्रमाणात रिकामा करावा लागेल. आगामी प्रसारण हक्क विक्रीसाठी आयसीसीने धमाकेदार स्पर्धांचा नजराणा पेश केला आहे. त्यामुळेच कोणती कंपनी हा लिलाव जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘क्रिकेटला अधिक आकर्षक बनविण्यासाठी अधिकाधिक संघांचा समावेश असायला हवा, अशी मागणी वारंवार होत असते. याच मुद्यावर विचार करीत आयसीसीने पुढील आठ वर्षांत वन डे विश्वचषकात १४ संघांचा समावेश केला, शिवाय टी-२० त २० संघांना संधी दिली. टी-२० विश्वचषकाच्या साखळीत २० संघांचा प्रत्येकी ४-४ च्या गटात समावेश करण्यात येईल. एकूण ४० सामने होतील. यानंतर सुपर एटमध्ये १२ सामने तसेच उपांत्य आणि अंतिम सामने होतील. अर्थात एकूण ५५ सामने खेळविणे म्हणजे आयपीएल खेळविण्यासारखेच आहे.’
- आकाश चोप्रा