दुबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या मैदानावरील आक्रमक वर्तनासाठी ओळखला जातो. त्यावरून त्याच्यावर टीकाही होत असते. असे असले तरी विराट वेळोवेळी खिलाडूवृत्तीचे दर्शनही घडवत असतो. त्यामुळेच आज झालेल्या आयसीसी पुरस्कारांमध्ये मैदानात दाखवलेल्या खिलाडूवृत्तीसाठी आयसीसीने विराटला 2019 साठीचा आससीसी स्पिरिट ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर केला आहे.
गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत विराटने खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले होते. या स्पर्धेत गटसाखळीत भारत आणि ऑस्ट्रेलिया लढतीवेळी स्टीव्हन स्मिथ फलंदाजीस आल्यावर प्रेक्षकांनी त्याची हुटिंग करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी विराटने प्रेक्षकांना स्मिथची हुटिंग करू नका, असे आवाहन केले होते.
दरम्यान, आयसीसीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी आयसीसीनं जाहीर केलेल्या वन डे आणि कसोटी संघाचे नेतृत्व टीम इंडियाच्या
विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. आयसीसीच्या वन डे संघात चार, तर कसोटी संघात दोन भारतीय खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. 2019मधील वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार टीम इंडियाचा हिटमॅन रोहीत शर्माने पटकावला आहे.
मात्र आयसीसी पुरस्कारांमध्ये विराटला एका पुरस्काराची हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी साधता आली नाही. इंग्लंडच्या बेन स्टोक्सनं त्याच्या या मार्गात खोडा घातला. यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार बेन स्टोक्सनं नावावर केला. स्टोक्सनं यंदाचं वर्ष खऱ्या अर्थानं गाजवलं. इंग्लंडला वन डे वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या स्टोक्सनं कसोटीतही आपला दबदबा राखला. अॅशेस मालिकेतील त्याची चिवट खेळी अविस्मरणीय ठरली. त्यामुळे त्याला यंदाची सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी देण्यात आली. त्यामुळे विराटला सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकण्यापासून वंचित रहावे लागले. विराटनं 2017 व 2018मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती.