मुंबई : आयसीसी वन डे व कसोटी संघाचे कर्णधारपद, वन डे व कसोटीतील सर्वोत्तम खेळाडू, सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी हे सर्व पुरस्कार विराट कोहलीने मंगळवारी नावावर केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) जाहीर केलेल्या पुरस्कारांत विराट एके विराट हेच नाव दिसले. कोहलीने प्रथमच सर्वोत्तम कसोटी खेळाडूचा पुरस्कार जिंकला, तर सलग दुसऱ्यांदा वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा व सर गार्फिल्ड ट्रॉफी पुरस्कार जिंकला आहे. आयसीसीच्या वन डे संघाचे कर्णधारपद कोहलीने तिसऱ्यांदा पटकावले आहे.
2018 वर्षात कोहलीने 13 कसोटी सामन्यांत 55.08च्या सरासरीने 1322 धावा केल्या आहेत आणि त्यात पाच शतकांचा समावेश आहे. 14 वन डे सामन्यांत त्याने 133.55 च्या सरासरीने 1202 धावा चोपून काढल्या. वन डेत त्याने मागील वर्षात सहा शतकं ठोकली, तर 10 ट्वेंटी-20 सामन्यांत त्याने 211 धावा केल्या. त्याने 2018 मध्ये 37 सामन्यांत 47 डावांमध्ये 68.37च्या सरासरीने एकूण 2735 धावा केल्या आहेत. त्यात 11 शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.
आयसीसीच्या कसोटी संघाचे कर्णधारपद पटकावून कोहलीने कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. कोहलीला 2017 व 2018 मध्ये आयसीसी कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाली आहे. धोनीला 2009 व 2010 मध्ये हा मान मिळाला होता. दोन वेळा आयसीसी कसोटी संघाच्या कर्णधाराचा मान कोहली व धोनी यांनी पटकावला आहे. सर्वाधिक पाचवेळा आयसीसीच्या वन डे संघाचे नेतृत्व धोनीकडे (2009, 2011, 2012, 2013, 2014) सोपवण्यात आले आहे. कोहलीने सलग तिसऱ्यांदा हा मान पटकावला आहे. कोहलीला धोनीच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी आणखी दोनवेळा आयसीसी वन डे संघाच्या कर्णधारपदी विराजमान व्हावे लागणार आहे.