Join us

सेमीत तरी टीम इंडियाला नाही त्या 'पनौती'ची भीती! भारत-ऑस्ट्रेलिया मॅचसाठी पंच ठरले

आतापर्यंत मोठ्या स्पर्धेत भारतासाठी अनलकी ठरलेला पंच सेमीत दिसणार नाही, ही टीम इंडियासाठी एक सकारात्मक बाबच म्हणावी लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 20:15 IST

Open in App

Champions Trophy 1st Semi-Final Officials : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. ४ मार्चला दुबईच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यासाठी आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) पंच आणि सामनाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. आतापर्यंत मोठ्या स्पर्धेत भारतासाठी अनलकी ठरलेला पंच सेमीत दिसणार नाही, ही टीम इंडियासाठी एक सकारात्मक बाबच म्हणावी लागेल. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हा पंच टीम इंडियासाठी आतापर्यंत अनेकदा ठरला 'अनलकी'

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आयसीसीनं पंच आणि सामनाधिकाऱ्याची नियुक्ती केल्यावर या यादीतील इंग्लंडच्या रिचर्ड केटलबरो (Richard Kettleborough) या पंचाचे  नाव चर्चेत आले होते. यामागचं कारण हा पंच ज्या ज्या वेळी मैदानात होता त्या त्या वेळी भारतीय संघासाठी तो अनलकी ठरला आहे. मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसलाय. साखळी फेरीतील पाकिस्तानमधील बहुतांश लढतीत रिचर्ड केटलबरो मैदानी अंपायरिंग पासून ते टिव्ही अंपायरपर्यंतची भूमिका बजावताना दिसले. पण दुबईतील एकाही सामन्यात ते दिसलेले नाहीत.  भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणाऱ्या पहिल्या सेमीत टीम इंडियासाठी बहुतांशवेळा 'पनौती' ठरलेला पंच मैदानात उतरणार नाही, यावर आयसीसीची मोहर उमटली आहे.

कोण असेल भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीच्या लढतीत मैदानी पंच?

आयसीसीने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबईत रंगणाऱ्या सामन्यासाठी अंपायर्सपासून ते रेफ्री पर्यंतची जबाबदारी कुणाकडे असेल त्याची घोषणा केलीये. पहिल्या सेमीत इंग्लंडचे दिग्गज पंच रिचर्ड इलिंगवर्थ आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेटर आणि विद्यमान पंच क्रिस गॅफ्फनी ही जोडी मैदानात पंच म्हणून काम पाहणार आहेत. थर्ड अंपायरची जबाबदारी  इंग्लंडचे अंपायर मायकल गॉफ यांच्याकडे देण्यात आली असून  फोर्थ अंपायरच्या रुपात दक्षिण आफ्रिकाचे अंपायर एड्रियन होल्डस्टॉक यांची निवड करण्यात आलीये. मॅच रेफ्रीच्या रुपात अँडी पायक्रॉफ्ट तर अंपायर कोचच्या रुपात स्टुअर्ट कमिंग्स हे प्रमुख भूमिका बजावताना दिसतील.

रिचर्ड केटलबरो यांना का म्हटले जाते भारतीय संघासाठी ते 'पनौती' रिचर्ड केटलबरो हे एक चांगले पंच आहेत. पण २०१४ मध्ये भारत श्रीलंका यांच्यात रंगलेली टी-२० वर्ल्ड कपची फायनल, २०१५ मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे वर्ल्ड कपची सेमी, २०१६ मध्ये भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० वर्ल्ड कपची सेमी, २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधील भारत-पाक यांच्यात लढती वेळी रिचर्ड केटलबरो मैदानी पंच होते. या सर्व सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला होता. २०१९ च्या  वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनल, २०२१ आणि २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्येही हा अंपायर असताना भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्येही हाच अंपायर होता. रिझल्ट तुम्हाला माहितीये की, ऑस्ट्रेलियानं फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत केले होते. अंपायरचा हा रेकॉर्ड पाहिल्यावर सेमीत न दिसणारा चेहरा भारतीय संघ फायनल खेळतानाही दिसून नये, असेच तुम्हीही म्हणाल. पण त्या सामन्यात कोण खेळणार याप्रमाणेच कुणावर कोणती जबाबदारी असेल, तेही अजून गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारतीय क्रिकेट संघ