ICC Test Team of The Year : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं २०२४ या वर्षातील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर कायमस्वरुपी सदस्य असलेल्या कसोटी संघातील खेळाडूंचा एक सर्वोत्तम संघ निवडला आहे. आयसीसीच्या वनडे संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळाले नव्हते. पण कसोटीतील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन भारतीय चेहऱ्यांचा समावेश असल्याचे दिसून येते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ना रोहितला ना विराट! ICC नं या खेळाडूला केलं बेस्ट टेस्ट टीमचा कॅप्टन
२०२४ हे वर्ष भारतीय संघासाठी आणि खास करुन विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी खूपच वाईट राहिले. कसोटी संघाला घरच्या मैदानात न्यूझीलंडकडून व्हाइट वॉशची नामुष्की ओढावली. एवढेच नाही तर आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून टीम इंडिया आउट झाली. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. या जोडगोळीमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या. प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या विराट आणि रोहितला ICC च्या संघात स्थान मिळालेले नाही. दुसरीकडे भारतीय संघाविरुद्ध घरच्या मैदानात बॉर्डर गावसकर ट्रॉफीवर उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्सला ICC नं २०२४ च्या सर्वोत्तम कसोटी संघाचे कर्णधार केलं आहे.
आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटी संघात बुमराहसह टीम इंडियातील या दोघांना मिळाले स्थान
जसप्रीत बुमराहनं गतवर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली. आयसीच्या पुरस्काराने सन्मान झालेल्या जसप्रीत बुमराहला आयसीसीनं सर्वोत्तम कसोटी संघात प्रमुख गोलंदाजाच्या रुपात स्थान दिले आहे. त्याच्याशिवाय युवा क्रिकेटर यशस्वी जैस्वालची सलामीवीराच्या रुपात या संघात वर्णी लागली आहे. रवींद्र जडेजाला अष्टपैलूच्या रुपात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्था न देण्यात आले आहे. यशस्वी जैस्वालनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या हंगामात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. याशिवाय जड्डूनं २०२४ मध्ये कसोटीत ५२७ धावांसह ४८ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. गतवर्षी जसप्रीत बुमराहनं १४.९२ च्या सरासरीनं ७१ विकेट्स घेत विक्रमी कामगिरी करुन दाखवली होती.
आयसीसीचा २०२४ मधील सर्वोत्तम संघ
यशस्वी जैस्वाल, बेन डकेट, केन विलिम्सन, जो रूट, हॅरी ब्रुक, कामेंदु मेंडिस, जेमी स्मिथ (विकेट कीपर), रवींद्र जडेजा, पॅट कमिन्स (कर्णधार), मॅट हेन्री, जसप्रीत बुमराह.