दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यातील फॉलोऑन नियमाबाबत सोमवारी घोषणा केली. सामन्याचा पहिला दिवस वाया गेला, तरी फॉलोऑनचा नियम बदलणार नसल्याचे आयसीसीने सांगितले.
हवामानाचा विचार करता या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. आयसीसीच्या फॉलोऑन कलम १४.१.१ नुसार, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला २०० धावांची आघाडी मिळाल्यास, प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा फलंदाजीसाठी बोलविले जाऊ शकते. ‘पहिल्या व दुसऱ्या दिवशी खेळ न झाल्यास, कलम १४.१ खेळाच्या प्रारंभापासून उर्वरित दिवसांच्या संख्येनुसार लागू होईल. सामना सुरू होणारा दिवस संपूर्ण दिवस म्हणून गणला जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ झाला नाही, तर फॉलोऑनसाठी आवश्यक आघाडी १५० धावांची होईल,’ असे आयसीसीने म्हटले आहे.