देशांतर्गत क्रिकेटमध्ये अलीकडेच एका १४ वर्षीय खेळाडूने आपल्या चमकदार कामगिरीने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले. बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने रणजी ट्रॉफीसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत पदार्पण करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. मात्र, या प्रचंड प्रतिभावान खेळाडूला लवकरच भारतीय सिनियर संघात संधी मिळणे अशक्य झाले आहे, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांमुळे त्याच्यावर ब्रेक लागला आहे.
वैभव सूर्यवंशी सध्या केवळ १४ वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (टेस्ट, वनडे आणि टी-२०) खेळण्यासाठी आयसीसीने नोव्हेंबर २०२० मध्ये एक कठोर नियम लागू केला आहे, ज्याला 'मिनिमम एज लिमिट' नियम म्हणतात. या नियमानुसार, कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी त्याचे वय किमान १५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. पुढील वर्षी 27 मार्चला वैभव १५ वर्षांचा होणार आहे. यानंतर तो भारताच्या वरिष्ठ संघात खेळण्यास पात्र होणार आहे.
आयसीसीने खेळाडूंचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हा नियम बनवला आहे. म्हणजेच, वैभव सूर्यवंशी याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याला किमान पुढील चार महिने वाट पाहावी लागणार आहे, जोपर्यंत तो १५ वर्षांचा होत नाही.
वैभवची शानदार कामगिरी
बिहारमधील या युवा प्रतिभावंताने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईविरुद्ध दमदार प्रदर्शन करत आपले कौशल्य सिद्ध केले आहे. अंडर 19 संघातही वैभव खूपच स्फोटक खेळी करत आहे. नुकतेच त्याने आणखी एका सामन्यात शतक झळकावत क्रिकेट पंडितांचे लक्ष वेधले होते. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे, आंतरराष्ट्रीय स्तरावर तो कधी पदार्पण करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.