Join us

"आज भारताचा 'हा' स्टार फलंदाज शून्यावर बाद व्हावा"; ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराची इच्छा

World Cup 2023 IND vs AUS: विश्वविजेता ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्क काय-काय म्हणाला, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 17:19 IST

Open in App

World Cup 2023 IND vs AUS: भारतात ५ ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपच्या सामन्यांना सुरूवात झाली. सर्वप्रथम गेल्या वर्ल्डकपमधील विजेता-उपविजेता यांच्यात सामना रंगला. त्यात न्यूझीलंडने इंग्लंडवर विजय मिळवला. वर्ल्ड कप भारतात असल्याने भारताच्या सामन्याकडे सारेच डोळे लावून बसले होते. अखेर रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात धडाकेबाज सामन्याला सुरूवात झाली. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या फलंदाजीच्या भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करावी अशी संपूर्ण भारतीय क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. पण तशातच भारताचा एक स्टार फलंदाज शून्यावर बाद व्हायला हवा अशी इच्छा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने व्यक्त केली आहे.

"भारतीय संघाचा दमदार फलंदाज विराट कोहली शून्यावर बाद व्हावा असं मला वाटतं. त्यानंतर फायनलला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यापर्यंत प्रत्येक सामन्यात त्याने शतक ठोकलं तरी चालेल पण आज ऑस्ट्रेलिया विरूद्ध त्याने शून्यावर बाद व्हावं अशी माझी इच्छा आहे. यामागचं कारण म्हणजे विराट कोहलीला खेळाचं खूप चांगलं ज्ञान आहे. तो खूप हुशार फलंदाज आहे. विराटची खेळी म्हणजे दर्जा आहे. त्याला गृहित धरण्याची चूक कोणताही प्रतिस्पर्धी संघ करणार नाही. सध्या तो चांगल्या लयीत आहे आणि वन डे हा त्याचा आवडता फॉर्मेट आहे. टेस्ट आणि टी२० मध्येही त्याची खेळी खुलते, पण वन डे त्याच्या मनाच्या जास्त जवळ आहे असे मला वाटतं," असे क्लार्क म्हणाला.

पुढे बोलताना क्लार्कने सांगितले, "सध्याचा विश्वचषक भारतात होतोय. त्यामुळे महत्त्वाची बाब म्हणजे त्याला तेथील खेळपट्ट्यांचा आणि हवामानाच चांगलाच अंदाज आहे. आव्हानाचा पाठलाग करण्यात त्याच्या इतका तरबेज फलंदाज मी अद्याप पाहिलेला नाही. तो खूपच चतुरपणे धावा जमवतो. त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने अद्वितीय कामगिरी केली तर त्याचे मला अजिबातच नवल वाटणार नाही. पण ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात त्याने शून्यावर बाद व्हावे म्हणजे ऑस्ट्रेलियाची जिंकण्याची संधी जास्त वाढेल."

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीआॅस्ट्रेलियामायकेल क्लार्क