नवी दिल्ली : ‘देशाकडून खेळताना मला १२ वर्षे झाली. जगात क्रिकेटच्या तुलनेत मला दुसरं काहीही पसंत नाही, याची प्रचिती आली,’ अशी प्रतिक्रिया स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने बुधवारी व्यक्त केली.
डावखुरी फलंदाज स्मृतीने २०१३ च्या पदार्पणापासून मागच्या महिन्यात एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकण्यात मोलाची भूमिका बजाविण्यापर्यंतच्या प्रवासावर एका कार्यक्रमात भाष्य केले. ती म्हणाली, ‘क्रिकेटपेक्षा अन्य कोणत्या गोष्टीवर माझे प्रेम असेल असे वाटत नाही. भारताची जर्सी परिधान करणे माझी सर्वांत मोठी प्रेरणा आहे. माझ्या स्वप्नांना बळ देण्यात मी सुरुवातीपासूनच स्पष्ट राहिले आहे. बालपणापासून फलंदाजीचे वेड होते. कोणाला पटत नसेल पण मला विश्व चॅम्पियन बनायचंय, असा निर्धार केला होता. विश्वविजेतेपद हे दीर्घकाळ मेहनतीचे फळ ठरले.’
भारतीय संघाची उपकर्णधार असलेली स्मृती पुढे म्हणाली, ‘या जेतेपदाची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती. मी १२ वर्षांहून अधिक काळ खेळत आहे. अनेकदा मनाविरूद्ध घटना घडतात. फायनल खेळण्याआधी विश्व चॅम्पियनची संकल्पना रंगविली होती. ती साकार होताच अंगावर शहारे आले. तो क्षण अविश्वसनीय होता. मिताली राज व झुलन गोस्वामी यांच्या उपस्थितीने भावना अनावर झाल्या. त्यांचे अश्रू सांगत होते की, महिला क्रिकेट जिंकले. तो त्यांचाही विजय होता. या विश्वचषक स्पर्धेमध्ये मला दोन गोष्टी शिकायला मिळाल्या, प्रत्येक खेळी शून्यापासून सुरू होते.
मागच्या डावातील शतकानंतर पुन्हा नवी सुरुवात कारावी लागते. दुसरे गोष्ट म्हणजे, नेहमीच संघासाठी खेळा!’ संगीतकार पलक मुच्छलसोबत विवाह रद्द केल्यानंतर स्मृती मानधनाचा हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम होता.