मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील घुवारा हे माझं गाव. एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला. वडील पोलिस दलात होते आणि आई गृहिणी. आम्ही पोलिस कॉलनीतील एका छोट्या शासकीय घरात राहात होतो. तिथेच माझं बालपण गेलं. लहानपणापासूनच मला खेळाची खूप आवड होती. परिसरात धुळीच्या मैदानावर मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ना किट होते, ना बूट. पण, एक ध्येय होतं आणि ते पूर्ण करण्याची जिद्द होती.
सुरुवातीला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नव्हती. हळूहळू मी परिसरातील छोट्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले. पण, त्या काळात अनेक सामाजिक अडचणी होत्या. मी मुलांसोबत खेळते, यावरून सतत टोमणे मारले जायचे. आईलाही ते पटत नव्हतं. ती म्हणायची, “क्रिकेट हा मुलांचा खेळ आहे, मुलींनी तो खेळायचा नसतो.” पण, मी हार मानली नाही. लोक थट्टा करायचे पण मी टिकून राहिले.
आठवीतच शाळाही सोडली
हा प्रवास सोपा नव्हता. एक काळ असा आला, जेव्हा आमचं कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडलं होतं. माझे वडील पोलिस खात्यातून निलंबित झाले होते, भावालाही रोजगार नव्हता, परिस्थिती खूप बिकट होती. मला क्रिकेट खेळणे थांबवावे लागेल की काय? असं वाटत होतं. या वाईट काळात अनेकांनी मदतीला नकार दिला. मला आठवीतच शाळा सोडावी लागली.
सरावाला जाण्यासाठी कुणी उधार पैसेही देत नव्हते. पण, माझ्या आईने तिचे दागिने विकून माझ्यासाठी पैशांची सोय केली. अनेकदा आम्हाला जेवणासाठीही लोकांकडून पैसे उसने घ्यावे लागत होते. लोकांना वचन द्यावं लागायचं की, “थोड्या दिवसांत पैसे परत देऊ.” या कठीण काळात मात्र, माझ्या प्रशिक्षकांची मला मोठी साथ मिळाली. राहण्याच्या व्यवस्थेपासून ते क्रिकेटच्या साहित्य पुरविण्यापर्यंतच्या जबाबदाऱ्या त्यांनी घेतल्या. खडतर प्रसंगात कुटुंबाने कधी माझी साथ सोडली नाही.
यंदाच्या महिला विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणारी गोलंदाज क्रांती गौड देशभरात चर्चेत आहे.
त्या दिवसाने आयुष्य बदलले
आमच्या येथे नौगावला दरवर्षी आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा भरते. वर्ष होतं २०१७. मी तेव्हा फक्त प्रेक्षक म्हणून गेले होते. पण, नियतीने तिथेच मला पहिलं खरं व्यासपीठ दिलं. एका संघातील मुलगी तब्येतीमुळे आली नव्हती आणि मला तिच्या जागी खेळण्याची संधी मिळाली. तो माझा पहिलाच लेदर बॉल सामना होता. त्यावेळी मी २५ धावा केल्या. २ विकेट घेतल्या. माझी निवड ‘सामनावीर’ म्हणून झाली. त्या दिवसाने आयुष्य बदललं.
(संकलन : महेश घोराळे)