मुंबई : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant Accident) याचा गेल्या महिन्यात अपघात झाला होता. ३० डिसेंबर रोजी सकाळी दिल्लीहून रुरकी येथील त्यांच्या घरी जात असताना त्यांची कार उलटली. तेव्हापासून पंत रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर प्रथम रुरकी आणि नंतर डेहराडून येथे उपचार करण्यात आले. यानंतर बीसीसीआयने त्यांना एअरलिफ्ट करून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले आणि पंतची शस्त्रक्रियाही तिथेच झाली.
रिषभ पंतची प्रतिक्रिया
अपघातानंतर रिषभ पंतची प्रथमच प्रतिक्रिया आली आहे. २५ वर्षीय खेळाडूने ट्विटरवर लिहिले की,''सर्व समर्थन आणि शुभेच्छांसाठी मी नम्र आणि कृतज्ञ आहे. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती देताना मला आनंद होत आहे. रिकव्हरीचा मार्ग सुरू झाला आहे आणि मी पुढील आव्हानांसाठी तयार आहे. बीसीसीआय आणि जय शाह व सरकारी यंत्रणांचे आभार.
रिषभ पंत २०२३ मध्ये मैदानापासून दूर राहू शकतो. त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि त्याला बरं होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. तो आयपीएल २०२३ तसेच या वर्षाच्या अखेरीस होणार्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर असू शकतो. २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पंत लवकरच टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू बनला.
२०२०-२०२१ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. गाबा येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यातील चौथ्या डावात नाबाद राहून त्याने संघाला विजय मिळवून दिला. याशिवाय पंतने इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतही कसोटी शतके झळकावली आहेत. त्याने गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये वन डे सामन्यात शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"