धावांची भूक अजूनही कायम; विश्वचषक स्पर्धेसाठी फलंदाजीत आणखी सुधारणा करणार - मिताली राज

भारताला इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:04 AM2021-07-05T09:04:16+5:302021-07-05T09:05:10+5:30

whatsapp join usJoin us
The hunger for runs still lingers; Will further improve batting for World Cup - Mithali Raj | धावांची भूक अजूनही कायम; विश्वचषक स्पर्धेसाठी फलंदाजीत आणखी सुधारणा करणार - मिताली राज

धावांची भूक अजूनही कायम; विश्वचषक स्पर्धेसाठी फलंदाजीत आणखी सुधारणा करणार - मिताली राज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वार्सेस्टर : ‘माझी धावांची भूक २२ वर्षांपूर्वी जशी होती, तशीच अजूनही कायम आहे. मी माझ्या फलंदाजीत आणखी सुधारणा करत असून पुढील वर्षी न्यूझीलंंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने माझ्या फलंदाजीचा स्तर आणखी उंचावण्याचा प्रयत्न करत आहे,’ अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने दिली.

भारताला इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, अखेरच्या सामन्यात मितालीने ८९ चेंडूंत केलेल्या ७५ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडला ४ विकेट्सने नमवले. या सामन्यातील कामगिरीच्या जोरावर मितालीने महिला क्रिकेटच्या सर्व प्रकारांत मिळून सर्वाधिक धावा काढण्याचा विश्वविक्रम केला.

मिताली म्हणाली की, ‘कारकिर्दीदरम्यान जे काही घडत गेले, त्याचा प्रवास सोप नव्हता. यासाठी अनेक परीक्षा आणि आव्हानांचा सामना केला. समोर येणाऱ्या प्रत्येक परीक्षेचा काही उद्देश असतो, हे मी सतत मानत आली आहे. असे अनेक प्रसंग आले, जेव्हा वाटले की आता खूप झाले. परंतु, कोणतीतरी एक गोष्ट आहे, ज्यामुळे मी खेळत राहिली आणि आज माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला २२ वर्षे पूर्ण झाली. असे असले, तरी माझी धावांची भूक मात्र कमी झालेली नाही.’ मिताली पुढे म्हणाली की, ‘माझ्यामध्ये अजूनही मैदानात उतरून भारतासाठी सामना जिंकण्याची जिद्द कायम आहे.’


 माझ्या फलंदाजीच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास, यात अजूनही सुधारणा करण्याची शक्यता आहे आणि यावर मी काम करत आहे.’ मितालीने २०१९ साली टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती आणि तिने याआधीच, पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणारी विश्वचषक स्पर्धा आपली अखेरची स्पर्धा असेल, असे सांगितले होते.

मितालीने एकटीच्या बळावर भारताला विजय मिळवून दिला : पोवार
मितालीने एकटीच्या बळावर संघाला विजय मिळवून दिला, अशा शब्दात भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांनी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या व शेवटच्या वन-डे सामन्यात कर्णधार मिताली राजच्या शानदार फलंदाजीची प्रशंसा केली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघावर क्लीन स्वीपचे सावट होते, पण मितालीने नाबाद ७५ धावांची खेळी करीत संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. बीसीसीआयने सामन्याच्या अखेरच्या क्षणातील ड्रेसिंग रूममधील माहोलचा व्हिडिओ शेअर केला. 
त्यात संघातील खेळाडू विजयाचा जल्लोष करताना दिसत आहेत. पोवार म्हणाले, गोलंदाजांनी संघाला पुनरागमन करून दिले, पण मिताली विजयाची हीरो ठरली.

विक्रमाने मितालीचा स्तर दाखवला-स्थळेकर
ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार लिसा स्थळेकरने सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडणाऱ्या मितालीचे कौतुक केले आहे. ‘खरं म्हणजे अखेरच्या सामन्यात स्टार ही मितालीच होती. तिने पुन्हा एकदा दाखवले की, का तिने सातत्याने विक्रम मोडणे सुरू ठेवले आहे. यावरून ती कोणत्या स्तराची खेळाडू आहे हे दिसून येते. ती धावांचा पाठलाग खूप चांगल्या प्रकारे करते. माझ्या मते धावांचा पाठलाग करताना तिची सरासरी शंभराहून अधिक असेल. तिची कामगिरी अवर्णनीय आहे,’ असे स्थळेकर म्हणाली.

विक्रम प्रदीर्घ कालावधीपर्यंत कायम राहणार
भारतीय महिला संघाची माजी कर्णदार शांता रंगास्वामी यांनी मिताली राजला महिला क्रिकेटची ‘सचिन तेंडुलकर’ असल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा तिचा विक्रम प्रदीर्घ कालावधीपर्यंत कायम राहील, असे म्हटले आहे.
-  मितालीच्या नावावर वन-डेमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम यापूर्वीच नोंदविला गेला होता. तिने शनिवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोट एडवर्ड्सचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये केवळ या दोनच खेळाडूंनी १० हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

-  भारतीय कसोटी व वन-डे संघाची कर्णधार असलेल्या मितालीने ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये ५१.८० च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

-  भारतीय क्रिकेट बोर्डच्या (बीसीसीआय) अव्वल परिषदेच्या सदस्य शांता रंगास्वामी म्हणाल्या, ‘विक्रमावरून तिच्या कामगिरीची कल्पना येते. तिने जे काही विक्रम नोंदवले ते महान सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाच्या बरोबरीचे आहेत. 

ती प्रदीर्घकाळ अव्वल स्थानी राहील, हे मी नि:संकोचपणे सांगत आहे. तिचा विक्रम अलीकडच्या कालावधीत मोडल्या जाईल, असे मला वाटत नाही.’

मितालीने शनिवारी अर्धशतकी खेळी करीत भारताला तिसऱ्या वन-डेमध्ये इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून दिला. भारताच्या अन्य फलंदाजांच्या कामगिरीव्यतिरिक्त मितालीच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित करण्यात आले, पण शांता रंगास्वामी यांच्या मते ही टीका चुकीची आहे.

रंगास्वामी म्हणाल्या, ‘सर्व फलंदाज चांगली कामगिरी करीत असताना स्ट्राईक रेट महत्त्वाचा ठरतो. कालचा अपवाद वगळता मालिकेत तिला अन्य फलंदाजांची योग्य साथ लाभली नाही. शनिवारी मिताली खेळपट्टीवर नसती तर संघाला २०० पर्यंत मजल मारतानाही संघर्ष करावा लागला असता.’

भारतीय फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीबाबत बोलताना शांता रंगास्वामी म्हणाल्या, तिसऱ्या क्रमांकावर दीप्ती शर्माला खेळविल्या जाऊ शकते. पहिल्या लढतीत पूनम राऊत तर उर्वरित दोन सामन्यांत जेमिमा रोड्रिग्स या स्थानावर फलंदाजीसाठी आली होती. पण तिला छाप सोडता आली नाही.

शांता रंगास्वामी म्हणाल्या, ‘ती सध्या युवा असून लवकरच धावा करण्यास सुरुवात करेल. पूनम राऊतनेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी केली होती.’
 

Web Title: The hunger for runs still lingers; Will further improve batting for World Cup - Mithali Raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.