Join us

Champions Trophy : वरुण चक्रवर्तीला दुबईचं तिकीट मिळाले तर कुणाचा पत्ता होईल कट?

भारतीय संघ व्यवस्थापन काय चाल खेळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 19:44 IST

Open in App

Champions Trophy 2025 India Squad Varun Chakravarthy : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी भारतीय संघानं इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी संघात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आतापर्यंत एकही वनडे सामना न खेळणाऱ्या वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आलं आहे. भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ निवडल्यावर हाच संघ इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेतही दिसणार हे फिक्स झाले होते. पण आता या संघात १६ व्या सदस्याची एन्ट्री झाल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातील एक खेळाडू रिस्क झोनमध्ये जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जाणून घेऊयात कोण असेल तो खेळाडू ज्याचा पत्त कट करुन वरुण चक्रवर्तीला मिळून शकतं दुबईच तिकीट त्यासंदर्भातील माहिती

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 एका जागेसाठी या दोघांत तगडी स्पर्धा 

इंग्लंड विरुद्धच्या वनडे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघानं कुलदीप यादवच्या रुपात प्रमुख फिरकीपटूला संघात स्थान दिले आहे. दुखापतीमुळे तो बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्याच जागी आता वरुण चक्रवर्तीची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या संघात एन्ट्री होऊ शकते. काही वृत्तामधून असा दावाही करण्यात येत आहे. पण सध्याच्या घडीला यासंदर्भात नेमका अंदाज बांधणं मुश्किल आहे. कारण वरुण चक्रवर्तीची संघात एन्ट्री झाली असली तरी कुलदीप यादवचं नावही संघात कायम आहे. त्यामुळे या दोघांच्यात प्रमुख फिरकीपटूच्या जागेसाठी तगडी स्पर्धा निर्माण झाल्याचे दिसून येते. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन वनडेतच या दोघांपैकी टीम इंडियाची कुणाला असेल पसंती ते चित्र स्पष्ट होईल.

या तारखेपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या संघात होऊ शकतो बदल

१९ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी अंतिम संघ यादी १२ फेब्रुवारीपर्यंत आयसीसीकडे सोपवायची आहे. याचा अर्थ या तारखेपर्यंत संघात बदल होऊ शकतो. आता वरुण चक्रवर्तीला दमदार कामगिरीचे बक्षीस देण्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी संघात घेताना अनुभवी कुलदीप यादवचा पत्ता कट होणार की, टीम इंडियाच्या ताफ्यातून आणखी वेगळी चाल पाहायला मिळणार ते बघण्याजोगे असेल.

टीम इंडियाला हा डाव खेळण्याचीही संधी 

वरुण चक्रवर्तीला दुबईचं तिकीट देण्यासाठी कुलदीप यादवला बाहेरचा रस्ता दाखवण्याशिवाय टीम इंडियाकडे आणखी तीन पर्याय उपलब्ध आहेत. यात वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या तिघांचा समावेश आहे. यात जड्डू आणि अक्षर पटेल हे सेफ झोनमध्ये असतील. तर वॉशिंग्टन सुंदरवर टांगती तलवार असेल. अनुभवी कुलदीप यादव फिट असेल तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यापेक्षा युवा वॉशिंग्टन सुंदरच्या जागी वरुण चक्रवर्तीला सेट करण्याचा डाव खेळला तर तो उत्तम ठरेल. त्यासाठी भारतीय संघाला आपल्या बॅटिंगवर विश्वास ठेवावा लागेल. तो नसेल तर हा डाव खेळण्याचं  धाडस टीम इंडिया करेल, असे वाटत नाही.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफीकुलदीप यादववॉशिंग्टन सुंदरअक्षर पटेलरवींद्र जडेजाभारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारत विरुद्ध इंग्लंड