भारताच्या १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील नायक यशपाल शर्मा यांचे आज निधन झाले. मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. ७० ते ८० च्या दशकात यशपाल हे टीम इंडियाच्या मधल्या फळीतील आधारस्तंभ होते. दिवंगत बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांच्यामुळे यशपाल यांची टीम इंडियात एन्ट्री झाली होती. दिलीप कुमार यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले अन् आज यशपाल शर्मा यांनी अखेरचा श्वास घेतला.
यशपाल यांची कारकीर्द घडवण्यात दिलीप कुमार यांचा मोठा वाटा होता. त्यांनी बीसीसीआयकडे शिफारस केल्यानंतर यशपाल यांना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर यशपाल शर्मा विश्वविजेता बनले. याबाबत यशपाल शर्मा यांनी स्वतः एका कार्यक्रमात सांगितले होते.
बिनधास्त, बेधडक!; यशपाल शर्मा यांची १९८३च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील 'ती' अविस्मरणीय खेळी अन् टीम इंडिया फायनलमध्ये, Video
त्यांनी सांगितले होते की,''माझी क्रिकेट कारकीर्द दिलीप कुमार यांच्यामुळे घडली. त्यांनी मला रणजी ट्रॉफी स्पर्धेतून बीसीसीआयपर्यंत पोहोचवले. माझं त्यांच्याशी भावनिक नातं आहे आणि ते आजारी असतात तेव्हा मलाही त्रास होतो. मला रणजी ट्रॉफी खेळताना त्यांनी पाहिले. दुसऱ्या डावात मी शतकाच्या जवळ असताना त्यांनी बीसीसीआयकडे माझ्यासाठी शब्द टाकला. पंजाबहून एक मुलगा आला आहे, त्याचा खेळ पाहा, त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे कौशल्य आहे, असे त्यांनी बीसीसीआयला सांगितले. त्यानंतर माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दार उघडले गेले.''
यशपाल यांनी ३७ कसोटींत १६०६ धावा, ४२ वन डेत ८८३ धावा केल्या होत्या. १९८३च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं गतविजेत्या वेस्ट इंडिजला पराभूत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यात यशपाल यांनी ८९ धावांची खेळी केली होती. त्यांच्या याच खेळीच्या जोरावर भारतानं ८ बाद २६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विंडीजचा संपूर्ण संघ ५४.१ षटकांत २२८ धावांत तंबूत परतला होता. रॉजर बिन्नी व रवी शास्त्री यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ६१ धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या २१३ धावांचा पाठलाग करताना भारतानं सहा विकेट्स राखून विजय मिळवला. भारतानं ५४.४ षटकांत ४ बाद २१४ धावा केल्या होत्या. याच सामन्यात यशपाल यांनी इंग्लंडच्या अॅलन लॅम्ब यांना शॉर्ट फाईन लेगवरून डायरेक्ट हिट करून धावबाद केले होते.