पराभवासाठी केवळ निवड समिती कशी काय दोषी?सकारात्मक मानसिकता रुजवायला हवी

निवडकर्ते खेळाडूंची निवड करतात, कामगिरी करणे खेळाडूंचे काम आहे. निवड समितीच्या कामात व्यवस्थापनाचे प्रतिबिंब उमटल्यास ते किती चांगले काम करतात, याचा परिणाम जाणवणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 02:04 PM2022-11-20T14:04:51+5:302022-11-20T14:06:06+5:30

whatsapp join usJoin us
How is only the selection committee to blame for the defeat A positive mindset should be inculcated | पराभवासाठी केवळ निवड समिती कशी काय दोषी?सकारात्मक मानसिकता रुजवायला हवी

पराभवासाठी केवळ निवड समिती कशी काय दोषी?सकारात्मक मानसिकता रुजवायला हवी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext


अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर 

टी-२० विश्वचषकातील ‘फ्लॉप शो’नंतर बीसीसीआयने ‘मिशन क्लीनअप’ सुरू केलेले दिसते. पहिला वार निवड समितीवर करण्यात आला. हाच संदेश संपूर्ण अंतर्गत यंत्रणेला जात नाही तोपर्यंत तरी हा केवळ देखावा ठरेल.

निवडकर्ते खेळाडूंची निवड करतात, कामगिरी करणे खेळाडूंचे काम आहे. निवड समितीच्या कामात व्यवस्थापनाचे प्रतिबिंब उमटल्यास ते किती चांगले काम करतात, याचा परिणाम जाणवणार नाही. आधी निवडकर्त्यांचा शब्द अंतिम असायचा. ते दिवस आता संपले. कर्णधार आणि मुख्य कोच यांच्याकडे अधिकचे अधिकार आले. एक-दोन खेळाडूंचा अपवाद वगळता कर्णधार आणि प्रशिक्षक यांची सहमती नसलेल्या खेळाडूंना संघात स्थान मिळण्याची शक्यता नसते.  शिवाय संघ व्यवस्थापन म्हणून कर्णधार, प्रशिक्षक आणि अनेकदा उपकर्णधार मिळून  अंतिम एकादश ठरवतात.  उदा. ऋषभ पंत आणि युझवेंद्र चहल हे विश्वचषक संघात नसावेत असा तर्क कोणीही करीत नाही. त्यांना संधी नाकारण्याचा निर्णय  निवडकर्त्यांचा नव्हे, तर प्रशिक्षक आणि कर्णधाराचा होता. या खेळाडूंना वेगवेगळ्या प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध कोणती भूमिका द्यायची आणि सामन्यादरम्यान कोणत्या सूचना करायच्या, यात निवडकर्त्यांची काहीच भूमिका नाही.  मैदानावर येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी खेळाडू स्वत:ची बुद्धी आणि अनुभव पणाला लावतात, हे अपेक्षित आहे. हे समीकरण त्यांच्या स्वत:च्या कुवतीवर जुळवून घेण्याच्या समायोजनेवर विसंबून असते. या गोष्टीचादेखील  निवडकर्त्यांशी  काहीही संबंध नाही. काही खेळाडू हे काम कौशल्याने हाताळतील तर काही विनम्रपणे.

उदा. टी-२० विश्वषचकात विराटने शानदार शैलीद्वारे धावांचा धडाका करीत तीन वर्षांआधीचा खराब फॉर्म विसरण्यास भाग पाडले. दुसरीकडे  सूर्यकुमार यादवच्या स्फोटक फलंदाजीने चकित केले. तो आता सर्वोत्तम      टी-२० फलंदाजांच्या पंक्तीत बसला. युवा अर्शदीप सिंग हादेखील उत्तम डावखुरा गोलंदाज म्हणून पुढे आला. निवडकर्त्यांनी दुर्लक्ष केले असते तर अर्शदीप मागे राहिला असता.

मुद्दा असा आहे की, जर विश्वचषकासाठी झालेली संघ निवड इतकी वाईट होती, तर ते ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी अधोरेखित व्हायला हवे होते. बुमराह, जडेजाच्या अनुपस्थित प्रत्येक जण संघ चांगली कामगिरी करेल, असा आशावाद व्यक्त करीत होता.

२०१३ च्या चॅम्पियन्स ट्राॅफीनंतर आयसीसीचे एकही जेतेपद आम्हाला मिळविता आलेले नाही.  आम्ही अनेकदा उपांत्य सामने हरलो. २०२१ ला जागतिक कसोटी अजिंक्य पदाचा अंतिम सामनाही गमावला. प्रश्न हा मानसिकतेचा, प्राधान्यक्रमांचा आणि दूरदृष्टीचा आहे. केवळ निवडक बदल हा रामबाण उपाय नाही. गरज आहे ती मानसिकता आणि विचार प्रक्रिया बदलण्याची. विजिगीषू वृत्ती जोपासणारी सकारात्मक मानसिकता रुजवायला हवी. हे उपाय वरपासून तळापर्यंत रुजायला हवेत. त्यासाठी  धोरणात्मक उपायांचा प्रसार व्हावा. शाश्वत उत्कृष्टतेची संस्कृती बिनधास्तपणे विकसित केल्याशिवाय यशापेक्षा अपयशच वारंवार येत राहील.

पराभवासाठी केवळ निवडकर्त्यांना जबाबदार धरणे हे दिशाभूल करणारे आहे. संघात मोठ्या आणि आमूलाग्र बदलाची मागणी होत असताना, माझ्या मते बीसीसीआय तयार करणार असलेली नवी निवड समिती आधीच्या ३०-३५ खेळाडूंमधून कदाचित संघाची निवड करेल. भारतीय क्रिकेट कमकुवत आहे किंवा टॅलेंटचा अभाव आहे, असे मुळीच नाही. संभाव्य यश कृतीत उतरविण्यातच कमकुवतपणा जाणवतो, ही मूळ समस्या आहे.
 

Web Title: How is only the selection committee to blame for the defeat A positive mindset should be inculcated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.