Sachin Taendulkar vs Virat Kohli Test Record : मॉडर्न क्रिकेटध्ये अधिराज्य गाजवणारा किंग विराट कोहलीनं टी-२० क्रिकेटनंतर आता कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतलीये. कोहलीचा कमालीचा फिटनेस पाहता तो एवढ्या लवकर हा निर्णय घेईल, असे कुणालाच वाटले नव्हते. पण रोहित शर्मा पाठोपाठ त्यानेही इंग्लंड दौऱ्याआधीच आश्चर्यकारकरित्या कसोटी क्रिकेटमधून थांबण्याचा निर्णय घेतलाय. विराट कोहलीनं आपल्या कसोटी कारकिर्दीत अनेक विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याची तुलना अनेकदा सचिन तेंडुलकरशी केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या विक्रमांचा वेगाने पाठलाग करतानाही दिसून आले. पण कसोटीत तो तेंडुलकरच्या खूप मागे राहिल्याचे दिसून येते. इथं एक नजर टाकुयात विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्या कसोटीतील खास रेकॉर्ड्सवर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सचिन-विराटपेक्षा अधिक सामने खेळला अन्...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकिर्दीत २०० सामन्यात ५३.७८ च्या सरासरीसह १५९२१ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावेच आहे. विराट कोहलीनं १२३ सामन्यात ४६.८५ च्या सरासरीसह ९२३० धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावांसह सरासरीच्या बाबतीत सचिन विराटपेक्षा भारी ठरतो. विराट कोहलीला कसोटीत १० हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील होण्याची संधी होती. पण त्याने याआधीच निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
कसोटीत शतकी रेकॉर्ड अन् सचिन-विराट यांच्यातील अंतर
कसोटी क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक झळकावणारा सचिन एकमेव फलंदाज आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे कसोटीत ५१ शतकांची नोंद आहे. कसोटीत सर्वाधिक शतक झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली ३० शतकासह १६ व्या स्थानावर आहे. विराट कोहली २१ शतकांनी सचिनपेक्षा मागे राहिल्याचे दिसून येते.
द्विशतकाच्या बाबतीत नंबर वन भारतीय
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकाचा विक्रम हा सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावे आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गजाने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५२ सामन्यात ८० डावात १२ द्विशतके झळकावली आहेत. यापाठोपाठ संगकारा (११), ब्रायन लारा (९) यांच्यापाठोपाठ किंग कोहलीचा (७) नंबर लागतो. सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागनं कसोटीत प्रत्येकी ६-६ द्विशतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
खेळाडू | सामने | डाव | धावा | सर्वोच्च धावसंख्या | सरासरी | शतके | अर्धशतक | द्विशतके |
सचिन तेंडुलकर | २०० | ३२९ | १५९२१ | २४८* | ५३.७८ | ५१ | ६८ | ६ |
विराट कोहली | १२३ | २१० | ९२३० | २५४* | ४६.८५ | ३० | ३१ | ७ |